‘ॲग्रिकल्चर हब’ वाचा काय आहे संकल्पना?

Agriculture Hub

अमरावती : शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या निविष्ठा, सेवा आणि सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून, अमरावती बाजार समितीने ‘ॲग्रिकल्चर हब’ ही संकल्पना मांडली आहे. तब्बल १२० एकरांवर हा प्रकल्प साकारला जाणार असून, त्याकरिता जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात येणार आहे.

अमरावती बाजार समितीच्या वतीने सध्या शेतीमालाची खरेदी होते. या भागात संत्रा लागवड क्षेत्र सर्वाधिक असताना बाजार समितीकडून मात्र संत्रा खरेदी होत नाही. सोयाबीन, भुईमूग, तूर अशा शेतीमालाच्या खरेदीवरच बाजार समितीचा भर आहे. आता मात्र बाजार समितीने ‘ॲग्रिकल्चर हब’ या संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली आहे. सभापती अशोक दहीकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या देखील पसंतीस ती उतरली. त्यानंतरच्या काळात या संकल्पनेला मूर्तरूप देण्याकरिता जागेचा शोध सुरू झाला. 

कोंडेश्‍वर मार्गावर शासकीय जागा आहे तर काही खासगी जागा बाजार समिती प्रशासन खरेदी करणार आहे. अशा प्रकारे सुमारे १२० एकरांवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे यासारख्या हंगामात लागणाऱ्या निविष्ठा, शेतीकामात वापरले जाणारे सयंत्र जसे ट्रॅक्टर व इतर अवजारांचे स्पेअर पार्ट, शेतीमालाची खरेदी- विक्री, रेशीम खरेदी तसेच आठवड्यातून एकदा गुरांचा बाजार असे सबकुछ एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे.

बाजार समिती व स्थानिक प्रशासनाकडून या संकल्पनेसाठी लागणाऱ्या जागेचे मोजमाप यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. मात्र त्यात काही त्रुटी असल्याने त्यांची पूर्तता करून नव्याने सादर करण्याचे बाजार समिती प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 

हे देखील वाचा :

Exit mobile version