शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प : आमदार सदाभाऊ खोत

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मवा सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे काही जणांनी समर्थन केले आहे, तर काही जणांनी या अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली आहे. काही शेतकरी संघटनांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत, यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच घोषणा केल्या नसल्याचे म्हटले आहे. तर रयत क्रांती संघटनेने या अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा आणि शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला असल्याचे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल हा हमीभावाने खरेदी करु, अशी महत्वपुर्ण घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली असल्याचे खोत म्हणाले.

या अर्थसंकल्पातून देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. ‘वन स्टेशन, वन प्रोडक्ट‘ या योजनेतून देशांमध्ये बाजारपेठेला चालना देण्याची भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यातून अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करुन सेंद्रीय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. सर्व पिकांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे. तसेच देशामध्ये कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे, हे देखील सुलभरित्या कळणार आहे.

देशात अधिकाधिक शेतकऱ्यांचा शेतमाल हा कमी खर्चात आणि वेगाने बाजारपेठेत कसा पोहोचेल, यासाठी रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात उभे करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला असल्याचे खोत यांनी सांगितले.शेतीमध्ये अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे, शेतीमध्ये आधुनिकीकरण आलं पाहिजे. त्यासाठी शेती विषयक महाविद्यालयचे जाळ उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषीच्या स्टार्टअप योजनेसाठी नाबार्ड योजनेअंतर्गत तरुणांना थेट कर्जपुरवठा करण्याची घोषणा केल्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना देखील उभारी मिळणार आहे. हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी बाराबलुतेदार यांच्या हाताला काम कसं मिळेल, छोटे छोटे उद्योगधंदे कसे उभे राहतील, त्यासाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी केली जाईल, हे डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

Exit mobile version