1200 -1500 कोटींची उलाढाल करणारे काजू उत्पादक संकटात ; जाणून घ्या कारण…

सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका असलेले काजू पीक संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लांबलेला पाऊस, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण या संकटचक्रातून तारेवरची कसरत करीत मार्गक्रमण करीत असलेल्या काजू बागायतदारांमागचे संकट संपण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वाऱ्याचा काजू बागांना तडाखा बसला असून, मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकरमधील काजूची झाडे अखेरच्या घटका मोजत असून हिरव्यागार बागा ओसाड दिसू लागल्या आहे. त्यामुळे यावर्षी काजूच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६७ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रांवर काजू लागवड आहे. दरवर्षी काजू लागवडीखालील क्षेत्रात सुमारे ५ एकरने वाढ होताना दिसत आहे. ६७ हजार पैकी सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील काजू उत्पादनक्षम आहेत. त्यामुळे काजू उत्पादनातून जिल्ह्यात दरवर्षी बाराशे ते पंधराशे कोटींची उलाढाल होते. परंतु, काजू उत्पादक शेतकरी यंदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्रातील ‘हे’ काजू संशोधन केंद्र देशात अव्वल

जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाचे मानलेले काजू पिक तीन – चार वर्षांत संकटचक्रात अडकले असून, काजू बागायतदार त्यात होरपळले जात आहेत. यावर्षी ऑक्टोबरमध्येच अनेक ठिकाणी काजूला चांगला मोहोर आला. परंतु, मॉन्सून लांबल्यामुळे हा मोहोर वाया गेला. त्यानंतर सतत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने थैमान घातले. संपूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला. त्याचा परिणाम काजू पिकावर झाला. त्यानंतर थंडी पडली. बागायतदारांनी विविध फवारण्या घेतल्या. त्यामुळे काजू बागांना पुन्हा पालवी आणि मोहोर आला. त्यातच पुन्हा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाला. दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहिले. त्याचा फटकादेखील काजू बागांना बसला.

संकटचक्राची ही मालिका सुरू असतानाच २८ आणि २९ जानेवारीला जिल्ह्यात जोरदार वारे वाहू लागले. सह्याद्री पट्ट्यात या वाऱ्याचा वेग प्रचंड होता. झाडे अक्षरक्षः पिळवटून टाकली जात होती. वाऱ्याचा हा तडाखा काजू पिकाला सहन झाला नाही. या वाऱ्यात काजूच्या झाडांना आलेला मोहोर, फळे आणि पानेदेखील वाऱ्यामुळे गळून पडली आहेत. काही ठिकाणी कच्चा काजू मोठ्या प्रमाणात गळून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

आतापर्यंत हिरव्यागार दिसणाऱ्या बागा आता ओसाड दिसू लागल्या आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना उपाययोजनाही करता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.बदलत्या वातावरणाचा फटका गेल्या काही वर्षांपासून काजू पिकाला बसत आहे. त्यामुळे भविष्यात द्राक्ष, डाळिंब पिकाप्रमाणे काजू पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय काजू व्यवस्थापनावरील खर्च वाढत असल्यामुळे काजूला अधिक दर मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संकटामागुनी संकट

२०१९ मध्ये कोरोनामुळे काजूचे दर गडगडले. ६० ते ७० रुपयांवर आले. त्यानंतर २०२० मध्येदेखील कोरोनाचा फटका बसला. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे कृत्रिम संकटे यामध्ये शेतकरी कोलमडून गेला आहे.  िजल्ह्यातील  कुंभवडे, नावळे, शिराळे, सडुरे, खांबाळे, आर्चिणे, सांगुळवाडी, कुर्ली (ता. वैभववाडी) घोणसरी, फोंडा, हरकुळ, नरडवे, नाटळ, भिरवंडे (ता. कणकवली) या भागातील अनेक बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Exit mobile version