सिंधुदुर्ग : अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पाची सभा नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या सभेमध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प वेंगुर्ले या प्रकल्पास देशातील उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र अंतर्गत काजू संशोधन केंद्रास हा बहुमान तिसर्यांदा मिळालेला आहे. यापूर्वी हा बहुमान त्यांना २०१६, २०१७ आणि २०२१ मध्ये मिळालेला आहे.
कशामुळे मिळाला पुरस्कार?
वेंगुर्ले येथील काजूच्या सुधारित जाती आणि आफ्रिकन देशातील काजू यांचे ‘फायटोकेमिकल्स’ पृथ्थकरण करण्यात आले. या पृथ्थकरणातील घटकावरून या संशोधन केंद्रावरील काजू जातीची प्रतवारी तसेच गुणवत्ताही आफ्रिकन देशातील काजू पेक्षा उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे. याचा फायदासुद्धा काजू बागायतदारांना तसेच प्रक्रिया उद्योगांना होणार आहे.
भाजीसाठी तेलविरहीत काजूवर संशोधन
काजूगराच्या भाजीसाठी या संशोधन केंद्रात तेलविरहीत आणि सहजपणे सोलता येणारी काजूच्या जातीवरील संशोधनसुद्धा सुरु आहे. त्याचप्रमाणे काजू उच्च घन लागवड तसेच इतर विविध संशोधनाचे काम सुरु आहे. ओला काजूगर किंवा भाजीसाठी वापरण्यात येणारा ओला काजूगरा संदर्भात नवीन संशोधन काय सुरू आहे. बाजारपेठेत ओला काजूगराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हॉटेल किंवा घरात ओल्या काजुगराची भाजी केली जाते. मात्र त्यात तेलकटपणा खूप असतो. तसेच ओला काजुगर काढण्यासाठी त्यावरील टरफल कडक असतं. त्यामुळे डिंक उडण्याची शक्यता असते. मात्र नवीन काजु विकसित करत आहोत, त्यात काजुगरावरील टरफल अतिशय मऊ असत. त्यामुळे त्यावरील टरफल काढणं सुलभ होणार आहे. तसेच ते तेलविहरित कसं असेल याबाबत संशोधन सुरू आहे. हे संशोधन विकसित झाल्यानंतर मग त्याचा प्रसार केला जाणार आहे. सध्या याबाबत संशोधन सुरू आहे.