रासायनिक कंपन्याच करणार सेंद्रिय खताचा पुरवठा; वाचा काय आहे केंद्र सरकारचा नवा नियम

nano-fertilizer

पुणे : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होवून सेंद्रिय खतांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आता देशातील रासायनिक खत कंपन्यांनी आता सेंद्रिय खताचाही पुरवठा करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. त्यामुळे खत कंपन्यांना आता रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचीही निर्मिती करावी लागणार आहे.

शेतजमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय खताचा वापर करावा असे आवाहन कायम सरकारकडून केले जात आहे. मात्र, उत्पादनवाढीसाठी शेतकरीही याकडे दुर्लक्ष करतात. पण आता खताच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या धोरणात बदल केल्याने सेंद्रिय खताचा वापर वाढेल असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा दर्जाही सुधारेल आणि रासायनिक खताचा वापरही कमी होईल असा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे. जमिनीची सुपिकता वाढवण्याच्या अनुशंगाने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांची निर्मिती व विक्री करण्याची सक्ती केंद्र सरकारने कंपन्यांवर केल्याने अन्नद्रव्य व्यवस्थापनात संतुलितपणा येणार आहे तर काळाच्या ओघात रासायनिक खताची जागा सेंद्रिय खत घेईल असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. पण रासायनिक खताबरोबर जैविक खते विकण्याचा प्रयत्न झाला तर तो काही लिंकिंग असे म्हणता येणार नाही असे निर्देश देण्यात आले आहे.

Exit mobile version