फरदडच्या मोहात कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे होवू शकते नुकसान; कृषी विभागाने दिला हा सल्ला

cotton

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पुढील हंगामात अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी या हंगामात शेतकर्‍यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. जर शेंदरी बोंडअळीला आताच रोखले नाही तर पुढच्या हंगामात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. जर पुढील हंगामात हे नुकसान टाळायचे असेल तर शेतकर्‍यांनी फरदड घेणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गुलाबी बोंडअळी ही कपाशीवरील अतिशय हानिकारक कीड आहे. ती बोंडाच्या आत राहून उपजीविका करते. कपाशीच्या बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. वास्तविक बीटी कपाशीद्वारे या अळीचे नियंत्रण होणे अपेक्षित होते. मात्र या कपाशीलाही अळी प्रतिकारक्षम होऊ लागल्याने समस्येत भर पडली आहे. त्यामुळे अळीचा जीवनक्रम संपुष्टात आणणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. अळीचा जीवनक्रम १-२ महिन्यात पूर्ण होतो. खाद्य नसताना अळीचे कोष सुप्तावस्थेत ३-४ महिने राहू शकतात. त्यामुळे अळीचा जीवनक्रम संपुष्टात आणण्यासाठी ४ ते ५ महिने कापूस विरहित शेत असणे आवश्यक आहे.

अळीच्या नियंत्रणासाठी डिसेंबर अखेरपर्यंत कापूस पीक काढणे गरजेचे आहे. ज्यामुळे किडीला खाद्य मिळणार नाही आणि तिचा जीवनक्रम संपुष्टात आणण्यास मदत होईल. बोंडअळीचे सुप्त अवस्थेतील कोष हे बोंडाच्या नाखात्या आणि जमिनीत असतात. त्यामुळे पीक काढल्यानंतर पिकाचे अवशेष शेतात ठेऊ नये. ते नष्ट करावेत किंवा त्याचे कंपोस्ट खत करावे. पीक काढण्यापूर्वी जर शेतात गुरे चारण्यास सोडली तर ती पाने, बोंडे, पाते खाऊन टाकतात. त्यामुळे अळीची अंडी व कोष नष्ट होतात. पीक काढल्यानंतर खोल नांगरणी करावी. कापसाच्या शेतात रोटाव्हेटर करू नये. नांगरणीमुळे जमिनीतील कोष वर येतील, ते पक्षी खातील, असा सल्ला देखील तज्ञांकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version