हरभरा पिकाच्या बंपर उत्पादनासाठी ‘हा’ आहे तज्ञांचा सल्ला

harbhara-gram-farming

औरंगाबाद : रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक पिक म्हणजे हरभरा. हरभरा पिकाच्या माध्यमातून शेतकरी चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. मात्र यासाठी तंत्रशुध्द पेरणी, बीजप्रक्रिया, योग्य वाणांची निवड, खतांचे योग्य व्यवस्थापन, घाटेअळी नियंत्रण आदी बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. आज आपण हरभरा पिकाची कशा पध्दतीने लागवड केल्यास शेतकर्‍यांना भरघोस उत्पन्न मिळू शकते, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हरभर्‍याचे विजय, विशाल, दिग्विजय, जाकी ९२१८ व पीकेव्हीके ४ हे प्रचलित व लोकप्रिय वाण आहेत. विजय आणि फुले विक्रम या मध्यम दाण्यांच्या वाणाकरिता ६५ ते ७० किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोर्‍या दाण्यांच्या वाणाकरिता १०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी.के.व्ही. ४ या जास्त टपोर्‍या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. तसेच चांगल्या उत्पादन घेण्यासाठी प्रति हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.

पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी, तर काबुली हरभरा पिकाकरिता ४५ द्ब १० सेंमी अंतरावर पेरणी करावी म्हणजे प्रति हेक्टरी अपेक्षित रोपाची संख्या मिळते. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. यानंतर प्रत्येकी २५० ग्रॅम रायझोबियम व पी. एस.बी. ही जिवाणू संवर्धके १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावीत. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभर्‍याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.

हरभरा पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात त्याकरिता ३० ते ३५ दिवसांनी पहिले व ६० ते ६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

घाटेअळी नियंत्रण
घाटेअळी ही हरभर्‍यावरील मुख्य कीड आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १० ते १२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे लावावेत. प्रभावी कीड नियंत्रण होण्याकरिता कीटकनाशके आलटूनपालटू न फवारावीत. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची (२५ कि.ग्रॅ./हे.) पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकील ५०० मि.ली. ५०० लीटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे.

Exit mobile version