सुधारित तंत्राने हरभरा लागवड करा अन् भरघोस नफा कमवा

harbhara-gram-farming

औरंगाबाद : रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या प्रमुख कडधान्य पीकांपैकी एक म्हणजे हरभरा. कोरडवाहू तसेच ओलिताखाली हे पीक चांगल्या प्रकारे घेता येते. अद्ययावत तंत्रज्ञान व योग्य व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास हरभर्‍यासारख्या पीकाच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य आहे. यासाठी सुधारित तंत्राचा वापर करण्याची आवश्यकता असते. जसे की, हरभरा लागवडीसाठी मध्यम ते भारी, भुसभुशीत, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. कोरडे व थंड हवामान या पीकास मानवते. घाटे भरत असताना ढगाळ वातावरण असल्यास पीकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच पीक फुलोर्‍यात असताना धुके पडल्यास पीकाचे भरपूर नुकसान होते. त्यामुळे वरील बाबी लक्षात घेऊन योग्य वेळेवर पेरणी करावी.

कोरडवाहू हरभर्‍याचे पीक घेताना पेरणीची वेळ ही जमिनीतील ओलाव्याचा विचार करून ठरवावी. तर बागायती हरभर्‍यासाठी थंडीचा विचार करावा लागतो. कोरडवाहू पीक जमिनीत पुरेसा ओलावा असताना २५ सप्टेंबरनंतर जमिनीतील ओल उडून जाण्यापूर्वी करावी. कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपावी. बागायती पिकाची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान केल्यास चांगले उत्पादन येते. पीकाचे मर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम बावीस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम हे जिवाणूसंवर्धन प्रति किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये चोळून लावावे. असे बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.

पेरणीची पद्धत व बियाण्याचे प्रमाण :
कोरडवाहू पीकाची पेरणी दोन ओळीत ३० सें.मी. व दोन बियातील अंतर १० सें.मी. राहील, अशा प्रकारे करावी. यासाठी विजय व दिग्विजय हे वाण वापरावेत. कोरडवाहू हरभर्‍याचे दुसोट्याचे पीक घेताना नांगराने पेरणी करावी. बागायती पीकासाठी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी.व दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे. लहान आकाराच्या बियासाठी (१०० दाण्याचे वजन २० ग्रॅम) ६० ते ६५ किलो, मध्यम आकाराच्या (२५ ग्रॅम पर्यंत ६५ ते ७० किलो), तर मोठ्या आकाराच्या (२६ ग्रॅमपेक्षा जास्त) १०० किलो / हे?टर बियाणे वापरावे.
कोरडवाहू हरभर्‍यास पेरणीपूर्वी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद जमिनीत मिसळून द्यावे. तर बागायती हरभर्‍यासाठी २५ किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. यासाठी १२५ किलो डीएपी खत पेरणीच्या वेळी पेरुन द्यावे. तसेच ३० किलो पालाश प्रति हे?टरी पीकास दिल्यास रोग प्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते. हरभर्‍यास जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते. यासाठी हे?टरी २५ किलो झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे. खते देताना माती परीक्षणाचा आधार द्यावा. खत विस्कटून टाकू नये. कोरडवाहू हरभरा पीकावर २ टक्के युरिया किंवा २ टक्के डीएपी द्रावणाच्या दोन फवारण्या केल्यास फायदा होत असल्याचा अनेक शेतकर्‍यांचा अनुभव आहे.

बागायती हरभर्‍यास पेरणीचे वेळी दिलेल्या पाण्याशिवाय पहिले पाणी पीक ४५ दिवसाचे असताना (फुलोर्‍यात येताना) आणि दुसर्‍या पाणी ७५ दिवसाचे असताना (घाटे भरतेवेळी) द्यावे. कोरडवाहू हरभर्‍यास पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक पाणी दिल्यास उत्पादनात २८ टक्के वाढ होते आणि दोन पाणी दिल्यास उत्पादनात ५० टक्के वाढ होते. पीकास जमिनीचा मगदूर पाहून पाणी द्यावे. जमिनीस भेगा पडण्याअगोदर पाणी द्यावे. मोठ्या भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास जमिनीस जास्त पाणी बसते व अतिपाण्यामुळे हरभरा पीकाचे नुकसान होते.

असे करा पीक संरक्षण :
हरभरा पीकावर येणारी महत्त्वाची कीड म्हणजे घाटेअळी. यामुळे पिकाचे जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान होते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
१) पीकात एक मीटरच्या ओळीत २ ते ३ अळ्या आढळून आल्यास कीड नियंत्रण करावे. मोठ्या आळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
२) पीकात चिमणी, साळुंख्या इ. पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे लावावेत.
३) फेरोमेन ट्रॅप्स हेक्टरी ४ ते ५ बसवून त्यातील नर पतंगाचा नाश करावा.
४) ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकाची कार्ड पीकामध्ये दर २० मीटरवर अडकवून ठेवावेत. यातून निघालेली कीटकआपली अंडी अळीच्या अंड्यात घालतात आणि आतील अळी नष्ट करतात.
५) अळीच्या नियंत्रणासाठी हेलीओथीस न्यु?लीअर पॉलीहॅड्रोसीस व्हायरस (एच.एन.पी.व्ही) अर्थात हेलीओकील या विषाणूचा वापर करावा. यासाठी हे?टरी २५० ते ५०० एल.ई. (लार्व्हल इक्विव्हॅलंट) अशी शिफारस केलेली आहे. त्यासाठी ५०० लिटर पाण्यात मिसळून १ हे?टरवर फवारणी करावी. विषाणूचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी मिश्रणात दर १० लिटरमध्ये १ ग्रॅम राणीपाल अधिक १ मि.लि. सॅन्डोवीट मिसळल्यास प्रभाव वाढू शकतो.
६) घाटेअळीसाठी निंबोळी अर्क अत्यंत उपयुक्त आहे. बाजारात निमार्क, निमसीडीन इत्यानी निंबोळी अर्क उपलब्ध आहेत अथवा शेतकरी स्वत: ५ टक्के निंबोळी अर्क तयार करुन ते वापरु शकतात. निंबोळी अर्कासोबत घाटेअळीचा विषाणू वापरल्यास घाटेआळीचे प्रभावीपणे नियंत्रण होऊ शकते.
७) घाटेअळीच्या नियंत्रणासाठी बी.टी. (बॅसीलस थ्रुर्रिजेनेसिस) जिवाणूची पावडर वापरतात. या जिवाणूमुळे अळीची पचनसंस्था नष्ट होवून अळ्या दोन दिवसात मरतात. यासाठी १ ते १.५ किलो पावडर प्रति हे?टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याची शिफारस केली जाते.

Exit mobile version