रेल्वेच्या ‘या’ एका निर्णयामुळे झाला चिक्कू उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा

पालघर : पालघर भागात चिक्कूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, जवळ मोठी बाजारपेठ नसल्यामुळे भौगोलिक मानांकन मिळालेल्या डहाणू, घोलवड येथील चिक्कूला योग्य तो दर मिळत नव्हता. मात्र, किसान रेल मुळे या भागातील चिक्कू थेट दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल होत आहेत. अवघ्या २४ तासामध्येच चिक्कू बाजारात दाखल होत असल्याने दर्जाही टिकून राहत आहे आणि दरही चांगला मिळत आहे.

कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या पश्चिम रेल्वेच्या किसान रेल मधून मागील वर्षभरात १२३ ट्रेनमधून तब्बल ३५ हजार टन चिकू दिल्लीला रवाना झाला आहे. दर्जेदार चिक्कूला आता योग्य ती बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शिवाय वाहतूकीअभावी होणारे नुकसानही टळले आहे.

पालघर मधील डहाणू, घोलवड, वाणगाव येथील चिकू हा देशभरात प्रसिद्ध असून परदेशातही या चिकुला मोठी मागणी आहे. मात्र पिकविलेला चिकू बाजारपेठेत वेळेत पोहचविणे हेच मोठे आव्हान असते कारण चिकू एक नाशवंत पिकं आहे. आता किसान रेलच्या माध्यमातून चिकू वेळेच्या आत बाजारपेठेत पोहचत असल्याने त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे. या सुविधेच्या पूर्वी ट्रकच्या माध्यमातून चिकूची वाहतूक होत होती. त्यासाठी साधारणत: ३४ तासाचा कालावधी लागत होता. आता यामध्ये १२ तासाची बचत झाली असून वाहतूकीचा खर्चही कमी झाला आहे.

Exit mobile version