अतिपावसामुळे सोयाबीन पाण्यात; ‘हा’ आहे कृषी विभागाचा सल्ला

soya sheti

औरंगाबाद : यंदा पावसाचे आगमन लांबल्यामुळे खरिपाच्या पेरण्यादेखील खोळंबल्या होत्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकर्‍यांनी चाढ्यावर मुठ ठेवली. सोयाबीनचा पेरा उशिराने झाला तरी उत्पादनात घट होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी कडधान्यांना डावलून सोयाबीनवर भर दिला. मात्र, पिकांची उगवण होताच राज्यभरातील पिकांना पावसाचा मुसळमार बसला. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी तुंबल्याने पिकांची पाने पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. यावर शेतकर्‍यांनी वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते. यामुळे वापसा होताच कृषी विभागाने सोयाबीनसह अन्य पिकांना वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

गत काही तासांपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. या दरम्यानच्या काळात शेतकर्‍यांनी शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधाकडून चर खोदावी लागणार आहे. त्यामाध्यमातून साठलेले पाणी वावराबाहेर काढले तरी सोयाबीन हे पिवळे पडणार नाही. शिवाय आणखी पाऊस झाला तरी चारीद्वारे पाणी वावराबाहेर येईल. वाफसा होताच सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणार्‍यां किटकांसाठीची फवारणी करणे गरजेचे असल्याचे सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

पावसामुळे शेतीकामेही रखडली
अधिकच्या पावसामुळे पिके सडण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी पिवळेही पडलेली आहेत. अशा परस्थितीमध्ये पीक फवारणीचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, पावसाची संततधार आणि शेत जमिनीत वाफसा नसल्याने शेतकर्‍यांना तणनाशक फवारणी, पाण्याचा निचरा करणे, निंदन, डवरे यासारखी कामे करता येत नाहीत. शेतामध्ये कोणते कामच करता येत नसल्याने पिके धोक्यात आहेत. वाफसा मोडल्याशिवाय शेतकर्‍यांना कोणतीच हालचाल करता येणार नाही.

Exit mobile version