ठिबक सिंचन : आधुनिक शेतीकडे एक पाऊल

शेती म्हटली कि पाण्याची गरज ही प्राथमिक गरज म्हणून ओळखली जाते. उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पद्धतीने शेतीसाठी करून घेता यावा यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. पाणी बचतीच्या संकल्पनेतून जन्म झाला सूक्ष्म सिंचन पद्धतींचा. या सूक्ष्म सिंचन पद्धतीतील ठिबक सिंचन पद्धती ही आधुनिक शेतीचा अविभाज्य भाग बनली आहे. आज आपण विस्तृतरित्या या सिंचन पद्धती विषयी जाणून घेणार आहोत.  

ठिबक सिंचन म्हणजे नेमके काय ?

पिकांच्या थेट मुळांशी प्लास्टिक नळ्यांच्या सहाय्याने थेंब – थेंब पाणी ठराविक दराने देण्याच्या प्रक्रियेस ठिबक सिंचन असे म्हणतात.

ठिबक सिंचनाचे प्रकार

मुख्यत्वे पिकाच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनाचे दोन प्रकार पडतात.
1) इनलाईन ठिबक 2) ऑनलाईन ठिबक

इनलाईन ठिबक – रांगेत ठराविक अंतरावर पेरलेल्या पिकांच्या सिंचनासाठी वापरले जाणारे ठिबक म्हणजे इनलाईन ठिबक. ह्यामध्ये थेंब – थेंब पाणी देणारे ड्रिपर नळी तयार करीत असतांना ठराविक अंतरावर नळीच्या आत टाकले जातात.

inline drip irrigation
इनलाईन ठिबक । Inline Drip

ह्या प्रकारातील ठिबक नळ्या विविध व्यासाच्या आकारात जसे कि १२ मि.मी., १६ मि.मी.,२० मि.मी. उपलब्ध असतात. तसेच पिकाच्या रोपांमधील अंतरानुसार थेंब – थेंब पाणी देणारे ड्रिपर १.०, १.२५, १.५० व २.० फुट अंतरावर उपलब्ध असतात.  

इनलाईन ठिबक प्रकारात दोन उप – प्रकार उपलब्ध आहेत. गोल / हायड्रोगोल  आणि पट्टी / चपटी इनलाईन ठिबक. ह्यामध्ये पट्टी / चपटी इनलाईन ठिबक हि कमी खर्चिक आणि कुठल्याही शेतकर्‍याला परवडणारी अशी आहे.

हि पट्टी / चपटी इनलाईन ठिबक नळी वेगवेगळ्या जाडीत जसे कि ०.१५  मि.मी.,०.२० मि.मी.,०.२५ मि.मी.,०.४० मि.मी.,०.५० मि.मी., आणि ०.७० मि.मी. उपलब्ध असते.  

ऑनलाईन ठिबक – एकमेकांपासून दूर अंतरावर पेरल्या जाणार्‍या पिकांसाठी जसे कि फळ पिके, शेवगा, बांबू , सागवान इत्यादी सिंचनास वापरल्या जाणारे ठिबक म्हणजे ऑनलाईन ठिबक. ह्यामध्ये थेंब – थेंब पाणी देणारे ड्रिपर झाडांमधील अंतरानुसार नळीस बाहेरून लावावे लागतात.

ऑनलाईन ठिबक

ह्या ठिबक प्रकारात सुद्धा  प्लेन ठिबक नळी १२ मि.मी., १६ मि.मी.,२० मि.मी.  व्यासाच्या आकारात उपलब्ध असते.  

बाहेरून पाणी देण्यासाठी लावावायचे ड्रिपर्स झाडांच्या वयानुसार त्यांची पाण्याची गरज भागविता यावी ह्यासाठी विविध प्रकारच्या प्रवाह दरात ( डिस्चार्ज रेट ) जसे कि २ लि., ४ लि., ८ लि., १६ लि., ३२  लि.आणि अ‍ॅडजस्टेबल प्रवाह दर असणारे उपलब्ध असतात.  

ठिबक चा डिस्चार्ज (प्रवाह दर) म्हणजे काय ?

ठिबक सिंचनातील थेंब – थेंब पानी देणारे घटक म्हणजेच ड्रिपर्स एका तासाला किती लिटर पाणी प्रवाहित करतात ह्यालाच ठिबकचा डिस्चार्ज (प्रवाह दर) असे म्हणतात.

इनलाईन ठिबक मध्ये साधारणतः डिस्चार्ज हा ४ लिटर / तास एवढा असतो. पण बर्‍याच वेळेस गैरसमजामुळे किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी २ तास / लिटर डिस्चार्ज असणारी ठिबक देखील वापरतात. ऑनलाईन ठिबक मध्ये विविध डिस्चार्ज असणारे ड्रिपर्स उपलब्ध असतात हे आपण वरील भागात माहित करून घेतलेच आहे.

चांगल्या प्रतीच्या ठिबक नळीची निवड कशी करावी ?

शेतकरी बांधवांनी ठिबक नळी निवडतांना ती नामांकित कंपनीची शुद्ध प्लास्टिक दाण्यापासून बनलेली ठिबकच निवडावी.  

बरेच शेतकरी बांधव ISI ब्रॅण्ड ठिबक नळीला प्राधान्य देतात. कारण, त्यावर शासनाची सबसिडी मिळत असते. परंतु, एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे कि हि सबसिडी खरच मिळते का?, वेळेवर मिळते का?, इतर ठिबक नळ्या आणि ISI ब्रॅण्ड ठिबक सारख्याच किंमतीत मिळतात का?, ह्या बाबींचा विचार न करता सर्रास ISI ब्रॅण्ड ठिबक घेणे कितपत रास्त आहे?

ह्या सर्व बाबी लक्षात घेता प्रारंभिक खर्च जास्त होऊ नये म्हणून त्याच गुणवत्तेची आणि ISI सारखेच आयुष्य असणारी नामांकित कंपनीची ठिबक शेतकरी बांधवांनी घेतल्यास ते कधीही फायद्यातच राहतील असे माझे प्रांजळ मत आहे.  

बर्‍याच वेळेस शेतकरी बांधव जुन्या ठिबक नळ्या विकून त्याबदल्यात नवीन नळ्या घेतात. अशा रीप्रोसेस केलेल्या ठिबक नळ्यांची गुणवत्ता ठीक नसते त्या जास्त काळ टिकत नाहीत तसेच उन्हात चिरल्या जातात. त्यामुळे चुकुनही अशा ठिबक खरेदी करू नये.

Exit mobile version