महाराष्ट्रातील एक बड्या नेत्याने युट्यूबवर पाहून केली ५० एकरात खजुराची शेती

जळगाव : शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणार्‍या राजकीय नेत्यांमध्ये बारामती व पवार कुटुंबाचे नाव नेहमीच घेतले जाते. मात्र आता महाराष्ट्रातील दुसर्‍याच एक बड्या राजकीय हस्तीने आखाती देशातून रोपे आणून चक्क खजुर शेतीचा प्रयोग केला आहे. तोही थोड थोडका नव्हे तर तब्बल ५० एकरात खजुर शेतीचा यशस्वी प्रयोग करुन दाखविला आहे. हा बडा नेता म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे…

eknath khadse dates farming
एकनाथ खडसे आपल्या शेतातील खजुराची बाग दाखवतांना…

खजुराचे उत्पादन आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आपल्याकडे हौसे खातर खजुराचे झाडं लावण्या पलीकडे उत्पादन घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. याची अनेक कारणे आहे. मुख्य मुद्दा म्हणजे खजुराचे उत्पादन उष्ण प्रदेशातच घेतले जाते व दुसरे कारण म्हणजे खजुराची शेती महागडी असते. खजुराचे रोप हे आखाती देशातून आयात करावे लागते. शिवाय एक रोप हे ४ हजार ५०० रुपयांना असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही.

हे देखील वाचा : दुष्काळी परिस्थितीत शोधला खजुर लागवडीचा मार्ग

एकनाथराव खडसे हे महाराष्ट्रातील बडे राजकीय नेते असले तरी ते एक प्रगतीशिल शेतकरी देखील आहेत. अनेक वर्षांपासून ते त्यांच्या मुक्ताईनगरातील कोथळी येथील शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. त्यांचा शेतीतील असाच एक प्रयोग सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. खडसे यांनी आखाती देशातून खजुराच्या रोपाची आयात करुन तब्बल ५० एकरामध्ये खजुराची लागवड केली आहे. शिवाय लागवडीपूर्वीच त्यासाठी आवश्यक असलेल्या वातावरणाचा त्यांनी अभ्यास केला होता. खानदेशातील तापमान यासाठी अनुकूल असून परागिकरणच्या दरम्यान थंडी असणे गरजेचे आहे तर फलधारणेच्या दरम्यान अतिउष्ण तापमान गरजेचे असते. या दोन्हीही बाबी खानदेशात असल्याने अवघ्या ४ वर्षात फलधारणा झाली असल्याचे खडसे यांनी सांगितले.

लागवड पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती ही त्यांनी युट्यूबवर घेतली होती. ४ वर्ष जोपासणा केल्यानंतर आता कुठे खजुराचे फळ लागले आहे. युट्यूबवर शास्त्रीय पध्दतीने माहिती घेवून खजुर शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. या प्रयोगातील काही त्रृटीही त्यांना कळाल्या असून याबाबत त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, खजुराचे रोपं खूप महाग असतात यामुळे खजुराचे रोपासाठी अनुदान देण्याची मागणी खडसे यांनी सरकारकडे केली आहेत. शिवाय या शेतीचा समावेश फळबाग योजनेत करावा अशी मागणीही केली आहे.

Exit mobile version