सोलापूर : खजुराची शेती ही प्रामुख्याने जास्त उष्ण हवामान व कमी पर्जन्यमान असलेल्या भागात केली जाते. आखाती देश खजुराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात राजस्थान, गुजरात येथील वाळवंटात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून खजुराची लागवड केली जाते. मात्र आता महाराष्ट्रातील दुष्काळी भाग म्हणून ओखल्या जाणार्या मराठवाठा, सोलापूर व विदर्भातही खजुर लागवडीचा प्रयोग होवू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सौंदरे (ता. बार्शी) येथील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांनी खजुर शेतीचा यशस्वी प्रयोग करुन दाखविला आहे.
सोलापुरात खजुराच्या पिकासाठी वातावरण पोषक आहे. याचा अभ्यास करुन राजाभाऊ देशमुख यांनी २००८ साली खजुराची लागवड केली. रोपे न लावता बियापासूनच त्याची लागवड केली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात या झाडाला फुले येतात. या फुलांचे फळात रूपांतर होऊन जून महिन्याच्या दरम्यान खजुराची तोडणी केली जाते. या बागेला उन्हाळ्यात थोडेफार पाणी लागते. या झाडांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी नसले तरी चालते. या झाडांची लागवड १८ बाय १८ वर केली असून या बागेमध्ये शेवगा, सिताफळ यासह अन्य आंतरपीकही घेण्यात आले आहे. पाण्यासाठी ठिंबक सिंचनचा वापर करण्यात आला आहे.

२५ एकरात नवनवीन प्रयोग
प्रगतीशिल शेतकरी राजाभाऊ देशमुख यांनी नवनवीन प्रयोग करत २५ एकर क्षेत्रात खजूर, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, सीताफळाचे उत्पादन घेतले आहे. २५ एकरामध्ये तीन एकर खजूर, चार एकरामध्ये द्राक्ष, सात एकरमध्ये ड्रॅगन फूट, दहा एकर शेतात सीताफळाच्या दोन वेगवेगळ्या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. याशिवाय शेवगा, चिंच याचे आंतरपीक त्यांनी घेतले आहे.