शेतकऱ्यांनो रब्बी हंगामातील पिकांसाठी हा आहे तज्ञांचा सल्ला

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व त्यानंतर पडलेली कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यासह सर्वच पिकांवर कीड- रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आता गत आठवड्यापासून वातावरण पूर्वपदावर येत असल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या संरक्षणासाठी योग्य वेळ आली आहे.

रब्बी हंगामात हरभरा, गहू ही दोन मुख्य पीके आहेत. शिवाय उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. या पिकांवरच शेतकर्‍यांचे उत्पादन अवलंबून आहे. यामुळे ही पिके ऐन बहरात असतानाच झालेल्या प्रादुर्भावापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.

हरभरा पिकाचे व्यवस्थापन करताना, पहिली फवारणी पीक ५० टक्के फुलोर्‍यात असताना, निंबोळी अर्क, अ‍ॅझाडिरक्टिन ५ मि.लि. प्रति लिटर, एचएएनपीव्ही ५०० एलई हे किंवा १ मिलि प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस २ मि.लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे तर अशाच पध्दतीने दुसरी फवारणी इमामेक्टिीन बेंझोएट ०.३ ग्रॅम किंवा क्‍लोरॅण्ट्रानिलिप्रोल ०.२५ मिलि, फ्ल्यूबेंडायअमाइड ०.५ मिलि किंवा बिव्हेरिया बॅसियाना ६ ग्रॅम याचे मिश्रण १ लिटर पाण्यात मिसळून ही १५ दिवसाच्या अंतराने करावी लागणार आहे.

गव्हावरील तांबेराचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षण दिसून येताच २ ते २.५ ग्रॅम डायथेन एम- ४५ प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकर्‍यांचा फायदा होतो.

कांद्यावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात मिसळून करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version