शेतकऱ्यांनो, शेतजमिनीची अशी घ्या काळजी…

औरंगाबाद : कोरोनाच्या काळात प्रत्येकाला स्वत:चे आरोग्य व निरोगी शरिराचे महत्व कळाले आहे. शरिर निरोगी असेल तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. हेच गणित शेतजमीनीलाही लागू पडते. भरघोस उत्पन्न घेण्यासाठी जमीनचे आरोग्य चांगले असण्याची आवश्यकता असते.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रीय कर्ब, जमिनीचे खोली, कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, सूक्ष्म जिवाणूंची संख्या इत्यादी घटकांमध्ये जमिनिची सुपीकता अवलंबून आहे.

जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण या चार गुणधर्माचा भौतिक- रासायनिक गुणधर्मात समावेश होतो. माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य संतुलित ठेवले तर चांगले उत्पादन घेता येते. सर्व साधारणपणे ६.५ ते ७.५ या दरम्यान सामू असल्यास पिकांना लागणारी सर्वच अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध स्वरुपात मिळतात आणि अशी जमीन सुपीक असते.

जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब अत्यंत गरजेचे असते. जमिनीत सेंद्रिय खतांसोबत जिवाणू खतांचा वापर केल्यास निश्चितच योग्य तो परिणाम साधला जाऊन जमिनीची सुपिकता टिकवली जाते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धीसाठी कमी मशागत व सपाटीकरण करावे. मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी. आंतर पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा. जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. पिकांचे अवशेष न जाळता गाडावेत. भर खतांचा (शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, प्रेसमड, कोंबडी खत, लेंडी खत, पाचट खत) नियमित वापर करावा.

Exit mobile version