शेतकर्‍यांना दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण मिळणार; जाणून घ्या काय आहे योजना

dairy products 1

कोल्हापूर : शेतकर्‍यांनी केवळ दूध पुरवठाच न करता, दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री केल्यास त्यांची चांगली आर्थिक प्रगती होऊ शकते. मात्र यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते. हाच धागा पकडून शेतकर्‍यांना दूध उत्पादनातून अधिकचा नफा मिळावा यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना विद्यापीठातर्फे आता दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.

महाराष्ट्रात दूध उत्पादनात अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत. हे तीनही जिल्हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या आखत्यारीत येतात. म्हणून या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरला उभारले जाणार असून, यासाठी साधारणत ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

केवळ दूधाची विक्री न करता दूध प्रक्रियेतून शेतकर्‍यांना ३० ते ५० टक्क्यांपर्यंत अधिकचा नफा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी शेतकर्‍यांना अत्यावश्यक ठरणारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. यात हे प्रशिक्षण केंद्र मोलाची भुमिका बजावू शकते.

सध्या कोल्हापूरमध्ये प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम सुरू आहे, मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होऊन दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून मिळाली आहे. शेतकर्‍यांना देण्यात येणारे प्रशिक्षण हे विनामूल्य असणार आहे. हे प्रशिक्षण तीन ते पाच दिवसांचे असणार आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version