आल्याचे हेक्टरी १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवण्यासाठी ही आहे सुधारित पध्दत

ginger

पुणे : मसाला पीक किंवा औषधी पीक म्हणून आल्याचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे आल्यापासून विविध पदार्थ तयार केले जात असल्याने शेतकर्‍यांचा आल्याच्या लागवडीकडे कल वाढतांना दिसत आहे. सुधारित तंत्रज्ञानाने आल्याची लागवड केल्यास हेक्टरी १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. आज आपण आल्यासाठी योग्य हवामान व जमीन, योग्य बियाणे, लागवडीची पध्दत, खते आणि पाणी व्यवस्थापन, काढणी आदींची माहिती जाणून घेणार आहोत.

आल्याची लागवड फुगलेल्या डोळ्यांच्या बोटांपासून करतात. अंदाजे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे रोगविरहित साठवणीतून काढलेले बोट (तुकडे/कुडी) लागवडीसाठी वापरतात. त्यावर १ ते २ रसरशीत डोळे असावेत. हेक्टरी १,५०० ते १,८०० किलो बेणे लागते. मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आले लागवडीसाठी योग्य असते. हलक्या, मुरमाड जमिनीत भरपूर शेणखत घातल्यास अशा जमिनीतही आल्याची चांगली वाढ होते. परंतु अशा जमिनीत वरचेवर पाणी देणे आवश्यक असते.

लागवड पद्धती
जमीन नांगराने १५ ते २० सें.मी. खोल नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० टन द्यावे. आल्याची लागवड सपाट वाफ्यावर रुंद वरंबा पद्धत किंवा सरी पद्धतीने करतात. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते. वाफे पद्धतीने २ ×बाय १ मीटर किंवा १.५ ×बाय ३ मीटर आकाराच्या वाफ्यात लागवड करतात. दोन बोटातील अंतर २२ ×बाय २२.५ सें.मी. किंवा २० बाय× २० सें.मी. ठेवावे. कंद ५ सें.मी. खोल लावावेत. सरी पद्धतीने ४५ सें.मी. रुंदीची सरी काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूने ४-६ सें.मी. खोल मातीत लागण करावी. रुंद वरंबा पद्धतीने ६ ते १० मीटर लांब व १.२५ मीटर रूंद सरी-वरंब्यावर २२.५ सें.मी.अंतरावर लागवड करावी.

खते आणि पाणी व्यवस्थापन
अधिक उत्पादनासाठी हेक्टरी ५० ते ६० गाड्या कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी द्यावे. हेक्टरी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या मात्रा रासायनिक खताच्या स्वरूपात द्यावात. स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी द्यावा व नत्राचे दोन हप्त्यांत विभाजन करून पहिला हफ्ता ४५ दिवसांनी व दुसरा हफ्ता १२० दिवसांनी द्यावा.

खोडमाशी किंवा कंदमाशी यांच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. रोगार ३० ईसी किंवा क्विनॉलफॉसची फवारणी करावी. यासाठी १० लीटर पाण्यामध्ये १० मि.ली. कीटकनाशक मिसळून पिकावर फवारावे. आल्यावरील पाने गुंडाळणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी कार्बारील किंवा
रोगार या कीटकनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी करावी. आल्यावर मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत पाणी साचल्याने होतो. म्हणून
निचर्‍याची जमीन निवडावी. रोग आढळल्यास झाडांच्या बुंध्यांशी ०.३ टक्के ब्लायटॉक्स किंवा ०.१ टक्का बाविस्टीनचे द्रावण वापरावे. बेणे लागवडीपूर्वी
०.३ टक्के ब्लायटॉक्स किंवा डायथेन एम-४५ किंवा २०० पीपीएम स्ट्रेप्टो सायक्लीनच्या द्रावणात बुडवून घ्यावे. पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम-४५, १० लीटरला २५ ग्रॅम प्रमाणे किंवा ब्लायटॉक्स ३० ग्रॅमप्रमाणे अथवा १ टक्का बोर्डो मिश्रण फवारावे.

काढणी : ओल्या आल्यासाठी लागवडीनंतर ६ ते ८ महिन्यांनी पाने पिवळी पडल्यावर किंवा वाळल्यानंतर पीक काढणीसाठी योग्य होते. मात्र सुंठ तयार करण्यासाठी पाला वाळून खाली पडल्यावर म्हणजे २४५ ते २६० दिवसांनी कुदळीने आल्याची काढणी करावी.

Exit mobile version