हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनो घाटीअळीवर असे आणा नियंत्रण

नागपूर : वातावरणातील बदलांमुळे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या हरभर्‍यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मादीने पानांवर कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर कळ्यांवर अंडी घालल्यावर त्यातून दोन, तीन दिवसांत अळी बाहेर येते. ती पानातील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळे देठ खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे फुलोर्‍यात फुले व कळ्या खाऊन नुकसान करतात. घाट्यातील दाणे खातात. एक घाटे अळी साधारणतः ३५ ते ४० घाट्यांचे नुकसान करते. यामुळे घाटीअळीचे योग्य व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टाळता येवू शकते.

तंत्रशुध्द पध्दतीने औषध फवारणी

पहिली फवारणी पीक ५० टक्के फुलोर्‍यात असताना, निंबोळी अर्क, अ‍ॅझाडिअ‍ॅक्टीन ५ मिली प्रति लिटर, एचएएनपीव्ही ५०० एलई हे किंवा १ मिलि प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस २ मि.लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तर अशाच पध्दतीने दुसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट ०.३ ग्रॅम किंवा क्‍लोरॅण्ट्राानिलिप्रोल ०.२५ मिलि, फ्ल्यूबेंडायअमाइड ०.५ मिलि किंवा बिव्हेरिया बॅसियाना ६ ग्रॅम याचे मिश्रण १ लिटर पाण्यात मिसळून ही १५ दिवसाच्या अंतराने करावी.

टी आकाराचे पक्षीथांबे उभारा

‘टी’ आकाराचे पक्षथांबे हेक्टरी २० प्रमाणात उभारावे. त्यामुळे पक्षी शेतातील अळ्या वेचून खातात. शेतात हेलील्युर वापरून हेक्टरी पाच कामगंध सापळे पिकापासून एक फूट उंचीच्या अंतरावर उभे करावे. त्यात सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास नियंत्रणाचे उपाय करावे.

Exit mobile version