अवकाळीपासून अशा पध्दतीने करा रब्बी पिकांचे रक्षण

लातूर : रब्बीच्या पेरणी दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट उभे रहिले आहे. हवामान विभागाने डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी योग्य खबरदारी घेतली तरच रब्बी हंगामाचे होणारे नुकसान टाळता येणार आहे.

या वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा हरभरा आणि गव्हावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अळीचा आणि वाढत्या बुरशीचा बंदोबस्त हा शेतकर्‍यांना करावाच लागणार आहे. बदलत्या वातावरणामुळे गव्हावर तांबोर्‍याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खताचा डोस देताना नत्र, स्फुरद, यांचे प्रमाण २:१ ठेवावे. पिकास पाणी देताना बेताने व गरजेपुरतेच द्यावे.

रोगाचे लक्षण दिसून येताच २ ते २.५ ग्रॅम डायथेन एम- ४५ प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकर्‍यांचा फायदा होतो. गव्हाचे उत्पादन तर वाढलेले आहे पण वातावणातील बदलामुळे तांबोरा रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. गव्हावर तांबोरा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ तर खुंटतेच पण वार्षिक उत्पन्न हे देखील घटते. त्यामुळे पावसाला सुरवात होण्यापूर्वीच अशाप्रकारे फवारणी केली तर त्याचा परिणाम होणार आहे.

बुरशीनाशकाची फवारणी

रब्बी हंगामात बुडाशी शेतात पाणी साचल्यास किंवा वातावरणात दमटपणा आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बुरशीनाशक म्हणून अ‍ॅडेक्झर हे औषध प्रभावी राहणार आहे. १५ लिटर पंपासाठी ३० मिली औषध पाण्यात मिसळावे. या मिश्रणात एक एकरामधील फवारणी होवू शकते. यासह बीएसएफ चे ओपेरा हे एक बुरशीनाशक महत्वाचे ठरणारे आहे. याचे प्रमाण देखील अ‍ॅडेक्झर प्रमाणेच ठेवावे लागणार आहे.

हरभर्‍याची अशी घ्या काळजी

हरभर्‍यावरील घाटीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे ते ही प्रति एकरी ८ लावणे गरजेचे आहे. जैविक नियंत्रणासाठी एकरी दोन ते तीन कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावणे गरजेचे आहे.

बटाटा, टमाटे, कांदा व वाटाण्याचे असे करा रक्षण

बटाटा आणि टमाटे या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. विशेषत: करपा रोगामुळे या पिकाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बटाटा आणि टमाट्यांमधील करपा रोगावर सतत लक्ष ठेवावे लागणार आहे. करपा रोगाची लक्षणे दिसताच कार्बांडीजम प्रति लिटर १.० ग्रॅम किंवा डिथेन-एम-४५.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे.

कांद्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भानृव झाल्यास डेथेन-एम-४५ फवारणी करणे योग्य आहे. वाटाण्याच्या पिकावर २ टक्के युरिया सोल्यूशन फवारून घ्यावा लागणार आहे. ज्यामुळे वाटाण्याच्या शेंगांची संख्या वाढणार आहे. याप्रमाणे २९ डिसेंबरपर्यंत फवारणी केल्यास भाजीपाल्याला तसेच रब्बीतील पिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.

Exit mobile version