…म्हणून भारत करतोय अमेरीकेच्या सोयातेलाची खरेदी

soybean-oil

पुणे : भारताला लागणाऱ्या तेलापैकी साधारणतः दोन तृतीयांश सोयातेल अर्जेंटिनाकडून आणि उर्वरित ब्राझीलकडून मिळतं. पण गेल्या हंगामात सोयाबीनचं उत्पादन कमी झाल्यानं अर्जेंटीनातल्या तेलाच्या साठ्यावर ताण आलाय. त्यामुळे भारतीय खरेदीदारांना पर्याय शोधावे लागतायत.

त्यात काळ्या समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातून सूर्यफूल तेल खरेदी करावं लागतंय. सूर्यफूल तेल पाम आणि सोयातेलापेक्षा स्वस्त पडतंय. पण रशिया-युक्रेन यांच्यातल्या तणावामुळे काही खरेदीदार सुरळीत पुरवठा होईल की नाही, याबद्दल साशंक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन दर वधारले असून सोयातेल, पाम तेल, आणि सूर्यफूल तेलही तेजीत आहे. परिणामी, देशांतर्गत सोयाबीन बाजाराला आधार मिळतोय. सोयाबीनच्या दरात सुधारणा कायम असून राज्यातल्या बाजारांमध्ये सरासरी 6200 ते 7000 रुपयांनी व्यवहार होत आहेत.

दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये सध्या दुष्काळामुळे सोयाबीन पुरवठ्यावर ताण आलाय. तर दुसरीकडे पाम तेलाच्या किमतीही वाढल्यात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अमेरिकेकडून सोयातेल आयातीला पसंती दिल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. याचा अमेरिकेतील सोयातेलाच्या किमतींना फायदा होण्याची शक्यता आहे. यंदा अमेरिकेतील खाद्यतेलाच्या किमती 20 टक्क्यांनी वधारल्या असून दशकभरातल्या सर्वोच्च पातळीच्या जवळ जाऊन ठेपल्याहेत.

जगातला सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार असलेला भारत सहसा अर्जेंटीना आणि ब्राझीलमधून सोयातेलाची खरेदी करतो. पण या दोन प्रमुख निर्यातदार देशांमध्ये सोयाबीन उत्पादन घटल्यानं भारतीय व्यापाऱ्यांनी अमेरिकेकडे मोर्चा वळवल्याचं व्यापाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलं. तसंच, येत्या काही दिवसांमध्ये आणखी दोन जहाज सोयातेल खरेदी होऊ शकतं, असंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version