दर वाढले मक्याचे मागणी वाढली तांदूळाची; रशिया-युक्रेन युध्दामुळे निर्माण झाले नवे व्यापारी समीकरण, जाणून घ्या सविस्तर

maize-rice

मुंबई : रशिया-युक्रेन युध्दामुळे विस्कळीत झालेला आंतरराष्ट्रीय व्यापार व घटलेले उत्पादनाचा परिणाम अन्नधान्य पुरवठा साखळीवर झाला आहे. यामुळे मक्याचे दर कधी नव्हे ते गगनाला भिडले आहे. वाढलेले दर आणि होत नसलेला पुरवठा यामुळे मक्याला पर्याय म्हणून तुकडा तांदूळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तुकडा तांदळाचे दर हे २ हजार १०० रुपयांवर पोहचले आहेत. असे होण्याचे कारण म्हणजे कुक्कुटपालनात कोंबड्यांच्या खाद्यात मक्याचा वापर केला जातो. आता मक्याऐवजी तुकडा तांदूळाचा वापर करण्यात येत आहे.

जगातील एकूण मका निर्यातीमध्ये युक्रेनचा वाटा हा १६ टक्के आहे. मात्र, युध्दामुळे येथील उत्पादन व निर्यातीवर परिणाम झाला आहे. मागणी व पुरवठा यातील गणित बिघडल्याने यंदा मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. यासह भारतात मक्याचे क्षेत्रही घटले होते. खरीप हंगामातील मका आता अंतिम टप्प्यात आहे. थोड्याबहुत प्रमाणात जी साठवणीक करुन ठेवलेली मका आहे ती हमीभाव केंद्रावर विकली जात आहे. या ठिकाणी २ हजार २०० रुपये ते १ हजार ८०० पर्यंतचे दर मिळत आहेत. यामुळे मका उत्पादक शेतकर्‍यांचा फायदा होत असला तरी कुक्कुटपालन करणार्‍या व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. या बाबतील पोल्ट्री धारकांच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात आले होते.

कोंबड्यांच्या खाद्यासाठी मक्याचे दर परवडत नसल्याने त्यास पर्याय म्हणून तुकडा तांदूळाची मागणी वाढली आहे. यामुळे कधी नव्हे ते तुकडा तांदळाला मक्याएवढी किंमत मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे तांदळाची उपलब्धताही कमी झाली आहे. भारत गेल्या काही वर्षांपासून चीन आणि व्हिएतनामला तुकडा तांदळाची निर्यात करत आहे. मात्र, यंदा उत्पादकता कमी झाल्यामुळे किंमती वाढल्या असून त्याप्रमाणात तुकडा तांदळाची मागणीही वाढत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version