शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी ‘या’ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण

mla-sameer-kunavars-agitation

वर्धा : कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे राज्यभरात विद्युत पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दुसरीकडे सन २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेली नाही. या विरोधात वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणामध्ये हिंगणघाट मतदार संघातील ४० गावच्या सरपंचांसह भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष देखील सहभागी झाले आहेत. शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी आणि विद्युत जोडणी तोडण्याचे काम थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करून जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे १७८ कोटींची मागणी करण्यात आली. पण, अद्यापही रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे महावितरणकडून थकबाकीदार शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा लावला आहे.

वातावरण निवाळल्याने रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ होत असल्यााने पिकांना पाणी देणेही गरजेचे झाले आहे. असे असतानाच वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई ही शेतकर्‍यांवर अन्याय करणारीच आहे. एकीकडे शेतकर्‍यांच्या हितासाठी सरकार कटीबध्द असल्याचे सांगितले जात असून दुसरीकडे असा अन्याय करुन हे सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप या उपोषणादरम्यान आ. समीर कुणावर यांनी केला आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version