का फिरवली शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पाठ? वाचा सविस्तर  

यवतमाळ : खासगी तूर खरेदी केंद्र आणि शासकीय तूर खरेदी केंद्राचे दर सारखेच असल्याने, शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. यंदा शासनाने तुरीला सहा हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. खासगीतील दरही सहा हजार ३०० रुपये एवढाच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांऐवजी खासगीमध्येच तूर विक्रीला प्राधान्य दिले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत सात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ साडेतीन हजार शेतकऱ्यांनी केंद्रांवर नोंदणी केलेली आहे.

जिल्ह्यात यंदा सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे तुरीच्या पिकाला प्रचंड फटका बसला आहे. परिणामी, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे. दुष्काळजन्य परिस्थिती व बोंडअळीमुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाला. सोयाबीनला पावसाचा फटका बसला. त्यामुळे तूर, उडीद व मूग आदी पिकांवर शेतकरी अवलंबून होते. यंदा तुरीच्या हमीभावात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. तुरीला सहा हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे.

बाजारात तुरीची आवक वाढली आहे. संधीचा फायदा घेत खासगी बाजारात तुरीचे दर पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे रुपयांपर्यंत गेले आहेत. यवतमाळ बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून, दिवसाला सुमारे सहाशे पोत्यांची आवक होते. मात्र, खुल्या बाजारात तुरीला हमीभावाप्रमाणे भाव मिळत असल्याने या तूर खरेदी केंद्रांकडे शेतकरी फिरकण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी नाफेडकडे तुरीची विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, खरेदी केंद्रांवर तूरच आणली नाही.

दरम्यान, आता नाफेडने महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लिमिटेडमारर्फत जिल्हयात सात खरेदी केंद्रे सुरू केली होती. यात महागाव, पांढरकवडा,  दिप्रस, बाभूळगाव, आर्णी, पुसद आिण पाटन येथे नाफेडचे तूर ऑनलाइन नोंदणी व खरेदी केंद्र सुरू केले आहेत. त्यासाठी तुरीची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती.

आतापर्यंत ३ हजार ६३४ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर ऑनलाइन नोंदणी केंद्रावर नोंद केली आहे. मात्र, एकाही शेतकऱ्यांने नाफेडकडे तूर विक्रीसाठी आणलेली नाही.सध्या खुल्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे खुल्या बाजारात तूर विक्री करून अधिकचे चार पैसे तत्काळ शेतकऱ्यांनी मिळत आहे. त्यामुळे नोंदणी केली असली तरी शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर न आणता खुल्या बाजारात तूर विक्री करत आहे.

Exit mobile version