कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

भंडारा : शेतकऱ्यांकडील थकित वीजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने कारवाई सुरू केली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मात्र वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई बेकायदेशीर असून वीज कंपनीनेच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

स्थानिक लाखांदूर तालुक्यात ७००० कृषीपंपधारक आहेत. या वीजपंपधारक शेतकऱ्यांकडून गत काही वर्षांत थकीत अथवा नियमित वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने सद्यःस्थितीत तालुक्यातील ९०६ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत तालुक्यातील तब्बल ६६० कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी ८० लक्ष ८८ हजार रुपये थकीत बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे संबंधित कृषीपंपधारकांचा वीजपुरवठा कायम खंडित आल्याची माहिती लाखांदूर येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

त्यामध्ये बारव्हा वीज मंडळा अंतर्गत ५४, लाखांदूर ६५, सरांडी (बु.) १३१ व विरली (बु) वीज मंडळांतर्गत सर्वाधिक ४१० कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. वीज कंपनीकडून सुरू असलेल्या या अन्यायकारक कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला 

कायद्यानुसार पुरवठा नाही

वीज कायद्यातील वीज पुरवठ्याच्या दर्जानुसार शेतीला वीजपुरवठा केला जात नाही. कायद्याने 230 ते 240 व्होल्ट या दाबाने वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात 100 ते 150 व्होल्ट या दाबानेच वीजपुरवठा केला जातो. कमी दाबाने व खंडित वीजपुरवठा केल्यामुळे होणार्‍या नुकसानीची भरपाई वीज कंपनीने शेतकर्‍यांना द्यावी, अशी कायद्यात तरतूद आहे. 15 दिवस आगाऊ नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई बेकायदेशीर असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगीतले. 

Exit mobile version