केळी कांदेबाग लागवडीची अशी करा पूर्वतयारी

banana-farming-drip-irrigation

जळगाव : कांदेबाग केळी लागवड म्हणजे ऑक्टोबर महिन्यात करावयाची केळी लागवड होय. कांदेबाग लागवडीस पीक वाढीच्या काळात कडक थंडी, तसेच घड निर्मितीपूर्व काळात अतिउष्ण हवामानाचा सामना करावा लागतो. घड निसवण्याच्या काळात उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतो. अशा तिन्ही विपरीत वाढीवर प्रभाव करण्याच्या काळात या बागेची वाढ होते. म्हणून काही विशेष काळजी घेतल्यास, चांगले व्यवस्थापन केल्यास या लागवडीपासून जास्तीचे उत्पादन मिळते. यासंबंधी तंत्रशुध्द माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पूर्व मशागत करतांना जमिनीचा वरील थर भुसभुशीत होईल हे बघावे. त्यानंतर रिजरने सर्‍या पाडाव्यात. सर्‍या पाडल्यानंतर त्या पाऊस नसल्यास ओलाव्यात. ८-१५ दिवसांनी या सर्‍या परत खोल व रुंद कराव्यात. शेणखत ही केळी पिकांसाठी अत्यावश्यक बाब असून, किमान ४० ते ५० मे.टन / हे. इतक्या शेणखताची आवश्यकता असते. शेणखत चांगले कुजलेले असावे. लागवडीपूर्वी शेणखत शेतात आणून त्यावर पाणी शिंपडावे. त्याला ओलसर करावे. त्यामुळे फायदा होतो.

केळी पिकांसाठी जैविकखतेसुद्धा महत्त्वाची ठरतात. यासाठी प्रती झाड २५ ग्रॅम अ‍ॅझोस्पिटिलम आणि २५ ग्रॅम पी.एस.बी. ही जीवाणूखते शेणखतासोबत मिसळून द्यावीत. यामुळे दिलेल्या अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढीस लागून चांगली वाढ आणि दर्जेदार फळाचे उत्पादन मिळण्यास मदत होते. मुख्य अन्नद्रव्यात प्रामुख्याने नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होतो. प्रतिझाड २०० ग्रॅम नत्र, ४० ग्रॅम स्फुरद आणि २०० ग्रॅम पालाश या अन्नद्रव्यांची आवश्यकता भासते. रासायनिक खते सरळ खताच्या स्वरूपात द्यावीत. खते वाफसा असताना द्यावीत. खते मातीने झाकावीत. नत्रयुक्‍त खते ही युरियाच्या स्वरूपात सर्वसाधारणपणे दिली जातात, तर स्फुरदयुक्‍त खते ही सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅशयुक्‍त खते ही म्युरेट ऑफ पोटॅशच्या स्वरूपात द्यावीत.

पाणी व्यवस्थापनाचे केळीसाठी अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. कांदेबाग लागवडीस सुरूवातीची पाण्याची गरज सीमित असली, तरी ती अवस्था फार संवेदनशील असते. बाल्य अवस्था ही अतिथंडीत येते. अशा वेळी रात्रीच्या वेळेस पाणी देतांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. जून लागवडीच्या केळीत, जुनारी मृगबाग, कांदेबाग किंवा बागेत पावसाचे अतिरिक्‍त पाणी साठू देऊ नये. बाग वाफसा स्थितीत राहावी, अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन असावे. पाटपाणी पद्धतीने पाणी देत असाल, तर योग्य अंतर पाणी नियमितता राखावी. कारण मुळ्याची वाढ, कार्यक्षमता, जमिनीतील पाणी आणि हवा यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असते. ठिबक सिंचनात जमीन ओलावा क्षेत्र महत्त्वाचे ठरते. मध्यम ते भारी काळ्या जमिनीत ओलावा क्षेत्र ४०-५० टक्के इतके असावे.

Exit mobile version