एकावे तर नवलच! जेलमधील कैद्यांनी सेंद्रीय शेतीतून घेतले नऊ कोटीचे उत्पादन  

Prison inmates

नागपूर : राज्यभरातील कारागृहाच्या मालकीच्या असलेल्या ३३० हेक्टर शेतीमध्ये कैद्यांनी गेली तीन वर्ष शेती कसली आहे. कैद्यांनी केलेल्या मेहनतीचे फळही त्यांना मिळाले असून, या शेतीतून तब्बल ९ कोटी रुपयांचे उत्पादन घेण्यात आले आहे. कैद्यांच्या परिश्रमामुळे राज्य कारागृह प्रशासनाला कोटय़वधीचा नफा झाला आहे.

ज्या कैद्यांच्या हातात कला-गुण आहेत, अशा कैद्यांना मजुरी दिली जाते. त्यासाठी राज्यातील सर्वच कारागृहात शेती, उद्योग, कारखाने आणि प्रकल्प सुरू करण्यात आले असून त्यामध्ये प्रशिक्षणानंतर कैद्यांना कामावर ठेवले जाते. राज्यात एकूण ४३ कारागृह आहेत. त्यामध्ये नऊ मध्यवर्ती कारागृह, २५ जिल्हा, पाच खुली कारागृह, एक महिला कारागृह आहे. या सर्व कारागृहांत जवळपास २२ हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात असणारे कच्चे कैदी आणि शिक्षा झालेल्या कैदी या उद्योगधंद्याबरोबर शेतीमध्येही काम करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये होणारी शेती कारागृह विभागाचा खर्च भागवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेतीचे उत्तम ज्ञान असलेल्या कैद्यांकडून फळभाज्या, पालेभाज्या, ऊस, भात, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन, केळी अशा पिकांचे उत्पादन घेतले जाते. २०१८-१९ या आर्थिक वर्षांत कारागृह विभागाने शेतीमधून ४ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पादन घेतले. २०२० मध्ये ४ कोटी ३८ लाखांचे उत्पादन घेतले. ‘सुधारणा व पुनर्वसन’ असे ब्रीद बाळगणाऱ्या राज्यातील कारागृहे शेतीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत हे कोट्यावधीचे उत्पादन घेतले आहे. कारागृहातील शेतीत कुठलेही रासायनीक खते वापरात येत नसून, यात फक्त सेंद्रिय शेती केली जाते.

पुण्यात शेतीपूरक व्यवसायही

पुणे कारागृहात सेंद्रिय शेती केली जाते. देशी बियाण्यांची पेरणी केली जाते. भाजीपाल्याच्या शेतात कोणतेही रसायन शिंपडले जात नाही. या शेतीतून मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो, कोबी, बटाटा, दोडका, भेंडी, मुळा पिकवला जातो. याशिवाय शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्धोत्पादन, शेळी, बोकड आणि कुक्कुट पालन केले जाते. २०२१ आणि २०२२ मध्ये करोनामुळे अनेक कैदी संचित रजेवर सोडल्यामुळे उत्पादन घटले.

पैठण कारागृह अव्वल

शेती उत्पन्नाच्या बाबतीत पैठण येथील खुल्या कारागृहातील कैदी प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांनी विविध प्रयोग करून उत्पादन क्षमता वाढवली आहे. त्यानंतर विसापूर कारागृह द्वितीय तर नाशिक रोड खुल्या कारागृहातील शेतकरी कैद्यांचा क्रमांक लागतो. पैठण कारागृहात भाजीपाला, फळे, ऊस मोठय़ा प्रमाणात पिकवला जात असून जवळच्या साखर कारखान्यात पाठवला जात आहे.

हे पण वाचा :

Exit mobile version