आंतरपीक पद्धतीद्वारे असे वाढवता येते कडधान्य उत्पादन

cereals-pulses

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, कुळीथ, मटकी, चवळी आणि घेवडा ही महत्त्वाची कडधान्ये पिके मोठ्या क्षेत्रावर घेतली जातात. कडधान्याच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित लागवड पद्धतीबरोबरच लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे हा एक पर्याय आहे. कडधान्य पिके पूर्णत: पावसावर घेतली जात असल्याने उत्पादनात नेहमीच अनिश्‍चितता आढळून येते. यादृष्टीने आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास निश्‍चित उपयोग होतो.

राज्यात बाजरी + तूर (२ ओळी बाजरी : १ ओळ तूर), सूर्यफूल + तूर (२:१), सोयाबीन + तूर (३:१), ज्वारी + तूर (२:१), कापूस + उडीद (२:१), तीळ + तूर (२:१), उडीद + तूर (२:१), मूग + ज्वारी (२:१), कापूस + मूग (२:१) ही खरीप हंगामामध्ये आंतरपीक पद्धती तर रब्बी हंगामामध्ये हरभरा + करडई (२:१), ऊस + हरभरा (१:१), गहू + हरभरा, मसूर + हरभरा, हरभरा +रब्बी ज्वारी, हरभरा + मोहरी, ऊस + मूग (१:२) ही आंतरपिके घेण्याची पद्धत आहे.

सामान्यत: ज्या पिकाच्या जास्त ओळी पेरतात ते मुख्य पीक व ज्या पिकाच्या कमी ओळी पेरल्या जातात त्यास ‘दुय्यम पीक’ म्हणून संबोधिले जाते. तृणधान्य, ऊस, तेलबिया आणि कडधान्य आंतरपीक पद्धतीत या दोनही आंतरपिकांच्या मुळांची वाढ भिन्न असल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये पुरेपूर पीक वाढीसाठी वापरली जातात. कोणतेही एक सलग पीक घेऊन येणार्‍या उत्पादनापेक्षा आंतरपीक पद्धतीत एकूण उत्पादनात वाढ होते. आंतरपीक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखाली अधिक क्षेत्र आणता येते आणि उत्पादनात स्थिरता येते. या पद्धतीत खताचा योग्य वापर होतो.

Exit mobile version