रब्बी कांदा लागवड करतांना असे करा नियोजन, होईल बंपर उत्पादन

onion-kanda

नाशिक : कांदा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. कांद्याच्या रोपांना थंड हवा मानवते. अधिक तापमान व आर्द्रता पिकास हानिकारक आहेत. रब्बी कांद्यासाठी बियांची पेरणी ऑक्टोबरमध्ये करून रोपांची पुर्नलागवड डिसेंबर-जानेवारीमध्ये करतात आणि एप्रिल ते मेमध्ये पीक काढणीस तयार होते. मात्र रब्बी कांदा लागवड करतांना योग्य नियोजन करणे आवश्यक असते. अन्यथा शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होवू शकते. आज आपण रब्बी कांदा लागवडीसाठी आवश्यक असलेले तंत्रशुध्द नियोजन कसे कराव? याची माहिती जाणून घेणार आहोत.

शेतातील पूर्वीचे पीक काढल्यानंतर शेत नांगरुन घ्यावे. मशागत करत असताना हे. ४० ते ५० बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट जमिनीत मिसळून द्यावे. पुर्नलागवडीसाठी शेताची आखणी सपाट वाफे अगर सरी वरंबा पद्धतीने करावी. मोठ्या आकाराचा कांदा हवा असल्यास अगर जमीन भारी असल्यास सरी वरंबा पद्धत चांगली आहे. रांगड्यासाठी व हिवाळ्यातील लागवडीसाठी सपाट वाफे पद्धत चांगली आहे. वाफ्याची रुंदी २ मीटर व लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. दोन सरीतील अंतर ३० ते ४५ सें. मी. ठेवून सर्‍या पाडाव्यात. एक हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीसाठी ९ ते १० किलो बियाणे लागते व त्यासाठी १० ते १२ गुंठे रोपवाटिकेसाठी लागते. कांद्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. गादी वाफा १ ते १.५ मी. रुंद २ मी. लांब व १५ सें. मी. उंच करावा. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात २ घमेले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट, २५० ग्रॅम सुफला (१५:१५:१५) व २० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्‍लोराईडकची पावडर मिसळावी.

खत व पाणी व्यवस्थापन
कांदा पिकास प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ८० किलो पालाश याप्रमाणे खते द्यावीत. यापैकी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी आणि उरलेले ५० टक्के नत्र दोन समान हप्त्यात लागवडीनंतर ३० ते ३५ आणि ४० ते ४५ दिवसांनी द्यावे, तसेच ५० किलो गंधक लागवडीच्या वेळी द्यावे. कांद्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते. यासाठी माइक्रोला या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्‍त द्रवरुप खताच्या दोन फवारण्या द्याव्यात. पहिली फवारणी ३० दिवसांनी व दुसरी ६० दिवसांनी करावी. प्रमाण प्रति एकरी ५०० मि. लि. माइक्रोला + २०० लिटर पाणी + १०० मि. लि. स्टिकर. रब्बी हंगामात कांदा पिकास जमिनीच्या मगदुरानुसार १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाने पिवळी पडू लागल्यावर कांदा काढणीपूर्वी २० दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. स्प्रिंकलर व ठिबकने पाणी दिल्यास पाण्याची बचत होऊन अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

रोग व कीड नियंत्रण
कांदा पिकावर प्रामुख्याने मर व करपा हे रोग आणि फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव होतो. मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी २ ते ३ ग्रॅम थायरम किंवा बावीस्टीन प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच नर्सरीमध्ये रोगाच्या नियंत्रणासाठी वाफ्यामध्ये प्रति चौरस मीटरला ५ ग्रॅम थारयम किंवा बावीस्टीन मिसळावे. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक १०० ग्रॅम ५ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून रोपवाटिकेच्या १०० चौ. मी. क्षेत्रात मिसळावे. वाफ्यात पाणी साचून देऊ नये. फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पुनर्लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी ७५० मि. लि. फिप्रोनिल (५ एस. सी.) किंवा ५०० मि. लि. प्रोफेनोफॉस (५० ईसी) किंवा ५०० मि. लि. कार्बोसल्फान (२५ ई. सी.) अधिक कॉपर ऑक्सीक्‍लोराईड १२५० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १००० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात स्टिकर मिसळून प्रति हे?टरी १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

Exit mobile version