फायद्यासाठी रब्बी हंगामातील चारापिके लागवडीचे तंत्र जाणून घ्या

Rabbi-season

नांदेड : चारा उत्पादनासाठी उपलब्ध क्षेत्र व बारमाही पाणी असेल तर त्याप्रमाणात हंगामानुसार व गरजेनुसार पिके घेता येतात. उन्हाळी व खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका व संकरित नेपिअर या पिकांचा समावेश करावा. रब्बी हंगामात मका, ओट व ज्वारी या पिकांचे पेरणी करावी. आज आपण रब्बी हंगामातील ज्वारी, मका व ओट या पिकांच्या पेरणीची तंत्रशुध्द माहिती जाणून घेणार आहोत.

ज्वारी : रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पेरणी करावी. पेरणीसाठी रुचिरा, फुले गोधन, फुले अमृता, मालदांडी ३५-१, या जातींची ३० सें.मी. अंतरावर पाभरीने पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अ‍ॅझेटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक चोळावे. पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे लागते. हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे त्यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्यावेळी व उर्वरित ५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

मका : पेरणीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जातींची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम अ‍ॅझेटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश पेरणीच्यावेळी व उर्वरित ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.

ओट : साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. पेरणीसाठी फुले हरिता (बहु कापणीसाठी), फुले सुरभी किंवा केंट (एक कापणीसाठी) या सुधारीत जातींचे हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अ‍ॅझेटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. ओट या चारा पिकासाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे यापैकी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४०किलो पालाश पेरणीच्या वेळी, तर उर्वरित ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ दिवसांनी व ४० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रति हेक्टरी द्यावे.

Exit mobile version