गव्हाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी तज्ञांच्या या आहेत शिफारशी

wheat

नागपूर : गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, योग्य रितीने पेरणी, बियाण्याचे प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याच्या योग्यवेळी पाळ्या, आंतरमशागत व पीक संरक्षण या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तज्ञांच्या शिफारशीनुसार गव्हाची बागायती वेळेवर लागवड केल्यास हेक्टरी ४५ ते ५० क्‍विंटल, बागायती उशिरा लागवड केल्यास ३५ ते ४० क्‍विंटल व जिरायत लागवड केल्यास १२ ते १४ क्‍विंटल उत्पादन मिळते. गव्हाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी तज्ञांनी कोणत्या शिफारशी केल्या आहेत, याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पेरणीची वेळ संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणार्‍या गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर मध्ये करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. एन.आर.ए.डब्ल्यू.-३०१ (त्र्यंबक), एन.आर.ए.डब्ल्यू.-९१७ (तपोवन), एम.ए.सी.एस.- ६२२२ हे सरबत्ती वाण व एन.आर.डी.डब्ल्यू.-२९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. बागायती उशिरा पेरणीसाठी एन.आर.ए.डब्ल्यू.-३४ आणि ए.के.ए.डब्ल्यू.- ४६२७ या वाणाप्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एन.आर.डी.डब्ल्यू.-१५ (पंचवटी) ए.के.डी. डब्ल्यू.-२९९७-१६ (शरद) हे वाण उपयुक्त आहेत. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन.आर.ए.डब्ल्यू.-१४१५ (नेत्रावती) व एच.डी. २९८७ (पुसा बहार) या सरबत्ती वाणांची लागवड करावी.

बियाणे व प्रक्रिया
गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ७५ टक्के डब्ल्यू.एस. या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणार्‍या जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन
बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे. उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश इतके द्यावे. निम्मे नत्र व स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.

Exit mobile version