रशिया-युक्रेन युद्धमुळे सूर्यफूल तेल महागणार; हे आहे कारण

sunflower-oil

पुणे : भारत सूर्यफूल तेलासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून आहे. यात युक्रेनचा वाटा जवळपास ८० टक्के आहे. त्यानंतर रशिया आणि अर्जेंटिनाचा नंबर लागतो. अर्जेंटिना आणि रशियातूनही भारतात सूर्यफूल तेल आयात होते. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युद्धाचा सूर्यफूल तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. कच्च्या तेलाच्या दराने १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा पार केला आहे.

याचा परिणाम इतर देशांमध्ये लगेच दिसून येत आहे. भारतात निवडणुकांमुळे इंधनाचे दर गेल्या काही दिवासांपासून स्थिर आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील मतदानाचा शेवटचा टप्पा ७ मार्चला संपल्यानंतर इंधनाचे दर किती वाढतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या युद्धामुळे केवळ पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढून महागाई वाढेल असे नाही, तर खाद्यतेल दराचा फटका बसेल. त्यातच भारत सूर्यफूल तेलासाठी या दोन देशांवरच अवलंबून आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाचे दर वाढले आहेत.

भारतात दरवर्षी जवळपास २२० ते २२५ लाख टन खाद्यतेलाचा वापर होतो. त्यात सूर्यफूल तेल २५ लाख टनांवर लागते. खाद्यतेल बास्केटमध्ये पाम तेल, सोयातेल आणि मोहरी तेलानंतर सूर्यफूल तेल चौथ्या क्रमांकावर आहे. दर वर्षी २२ ते २५ लाख टन सूर्यफूल तेलाची गरज असते. त्यापैकी देशात केवळ ५० हजार टनांच्या दरम्यान उत्पादन होते. बाकी सूर्यफूल तेल आयात केले जाते. आयातीमध्ये युक्रेन आणि रशियातून येणाऱ्या सूर्यफूल तेलाचा वाटा अधिक आहे. 

अर्जेंटिनातूनही काही प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात होते. रशियाने आपले सैन्य सीमांवर तैनात केल्यानंतर युक्रेनने पोर्टवर कामकाज बंद केले आहे. यामुळे शेतीमालासह इतर वस्तूंचा व्यापार प्रभावित झाला आहे. रशियाने काळा समुद्र प्रदेशातील आपली बंदरे व्यापारासाठी खुली ठेवली. मात्र जहाज मालकांनी धोका नको म्हणून वाहतूक बंद ठेवली आहे. तसेच धोका लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी प्रिमियमही वाढवला आहे. त्यामुळेही सूर्यफूल तेलाची वाहतूक प्रभावित झाली आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version