पुण्यात उभारणार सहकार संकुल

पुणे : सहकार विभागाची शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये एकाच छत्राखाली येणार असून, त्यासाठी सुमारे ९५ कोटी रुपये खर्च करून येरवडा येथे ‘सहकार संकुल’ उभारण्यात येणार आहे. सहकार विभागाच्या अंतर्गत पुणे शहरातील २३ कार्यालये खासगी जागेत भाडेपट्टीवर कार्यरत आहेत.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, साखर संकुलासह अन्य खासगी ठिकाणी ही कार्यालये आहेत. त्यावर वार्षिक भाड्यापोटी मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी खर्च होत आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या कामासाठी या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे सहकार विभागाची शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये एकाच छत्राखाली आणण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या विचाराधीन होता.

त्यानुसार सहकार आयुक्त यांनी येरवडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर ‘सहकार संकुल’ इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सुमारे १०८ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय समितीने ९४ कोटी ५९ लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. प्राधिकारी किंवा अभियंता यांची मान्यता आणि अर्थसंकल्पात तरतूद झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा :

Exit mobile version