बीजप्रक्रिया केल्यास होणार नाही नुकसान; वाचा सविस्तर

bij

हिंगोली : पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बर्‍याच सूक्ष्मजिवांचा प्रसार बियाण्याद्वारे होत असतो. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रिया म्हणजे बी-बियाण्यास किंवा लागवडीसाठी वापरल्या जाणार्‍या रोपांना, त्यांच्या निरोगी उगवणीकरिता किंवा रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी रासायनिक, जैविक किंवा भौतिक घटकाची प्रक्रिया करणे म्हणजेच बीजप्रक्रिया होय.

बीजप्रक्रियेचे फायदे
१) बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित व एकसारखे कवच तयार होतेे.
२) रोग नियंत्रणाच्या खर्चात बचत होते तसेच फवारण्यांवरील खर्चाची बचत होऊन जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते.
३) बियाण्याची उगवणशक्‍ती वाढून उत्पन्नात वाढ होते.
४) पीक एकसारखे वाढते, मशागतीचा व पिकरक्षणाचा खर्च कमी होतो.
५) बीज अवस्थेमध्येच बियाण्यावर संस्करण होत असल्यामुळे बुरशीजन्य रोग किंवा माती आणि बियाण्यापासून उद्भवणार्‍या रोगाची लागण
मोठ्या प्रमाणात होत नाही.
६) बियाण्याची उगवण निरोगी आणि सम प्रमाणात होऊन पुढील रोगप्रसार थांबतो.
७) बीजप्रक्रियेमुळे नत्र, स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खतावरील खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होते.

बीजप्रक्रियेमध्ये घ्यावयाची काळजी
१) बियाण्यास प्रथम रासायनिक औषधांची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतर जैविक घटकांची बीजप्रक्रिया करावी. बियाणे भांड्यात/ताडपत्रीवर
घेऊन त्यावर दिलेल्या प्रमाणात रासायनिक बुरशीनाशक टाकून खाली-वर करावे व संपूर्ण बियाण्यास चोळावे जेणेकरून बियाण्यावर बुरशीनाशकाचा सारखा थर बसेल.
२) बीजप्रक्रियेसाठी वापरावयाची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात सारखी लागतील याची काळजी घ्यावी. ती कमी झाल्यास रोगापासून पुरेसे संरक्षण मिळत नाही व जास्त झाल्यास बियाण्याला अपाय होतो.
३) रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना हातात रबरी/प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत, डोळ्यांना चष्मा व नाकाला रुमाल बांधावा, शरीरास इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४) प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्‍लॅस्टिक पिशवीत भरू नये. त्यापूर्वी असे बियाणे थंड व कोरड्या हवेत सावलीत २४ ते ४८ तास वाळवावे.
५) प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून वाळवून पेरावे.

Exit mobile version