शेतीतून लाखोंचे उत्पादन घेण्यासाठी अशा प्रकारे करा शेडनेटगृह तंत्रज्ञानाचा वापर

shed-net-house

फोटो क्रेडिट : Green Pro

शेडनेटगृह हे सावलीसाठी नेट (जाळी) ह्या प्रकारच्या आच्छादनाने झाकलेला सांगाडा फ्रेम असलेले घर असून ते जी.आय . हे पाईप, लोखंडी अँगल्स, लाकूड किंवा बांबू यांपासून बनविलेले असते. ते निरनिराळ्या सावलीच्या गुणांकाच्या प्लास्टीकच्या जाळीने (शेडनेटस्) झाकलेले असते. या जाळ्या विशिष्ट यु. व्ही. संस्कारीत अशा १०० टक्के पॉलीईथिलिन धाग्यांपासून तयार केलेल्या असतात. या शेडनेटच्या सहाय्याने दिवसा पिकांसाठी प्रकाशाची तीव्रता व प्रभावी उष्णता कमी करता येत असल्याने बर्‍याच अंशी वातावरणावर नियंत्रण करता येते.

यामुळे हरितगृहाप्रमाणे शेडनेटगृहाचा उपयोग निरनिराळ्या भाजीपाला व काही फुलपिकांसाठी उपयुक्त अशी वातावरण निर्मिती करून चांगल्या प्रतीचे जास्त उत्पादन मिळविण्यासाठी करता येतो. शेडनेटगृहात वातावरणातील तापमान, आर्द्रता, कर्बवायु, वारा इत्यादी घटकांवर बर्‍याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येत असल्याने शेडनेटगृहातील पीक लागवड ही उघड्या शेतातील पीक लागवडीपेक्षा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. शेडनेटगृहात पावसाळा सोडून इतर हगामात पीके घेता येतात.

ज्यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त असते अशावेळेस पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त तापमानात तग मारणे कठीण होते. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धताही कमी असते. कमी पाण्यात व अती तापमानात पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतात व उत्पादनात लक्षणीय घट आल्याने उत्पन्न कमी मिळते. अशा स्थितीत पिकांना शेडनेटच्या सहाय्याने सावली केली तर वातावरणातील तापमान तर कमी होतेच शिवाय पिकांची पाण्याची गरज सुध्दा कमी होते व त्यामुळे पीक लागवड यशस्वी होते. पिकांसाठी शेडनेटगृहाचे क्षेत्र ५ गुंठ्यांपासुन १ एकरपर्यंत असू शकते.

शेडनेटगृह लागवडीचे फायदे

१. बाजारपेठेतील मागणीप्रमाणे पिकाची लागवड करता येते.
२. भाजीपाला पिकाशिवाय शोभिवंत लहान झाडे, फुलझाडे, फळभाज्या, औषधी व सुगंधी वनस्पती, मसाला पिके व नर्सरी रोपे (भाजीपाला व फळझाडे) यांची यशस्वीपणे लागवड करता येते.
३. पिकाचे अति व कमी तापमान, वारा, गारठा, पक्षी व किटक यांच्यापासून संरक्षण होते.
४. पिकास जास्त आर्द्रता आवश्यक असल्यास फॉगर्सच्या सहाय्याने निर्माण करता येते.
५. शेडनेटगृहाने विशेषतः उन्हाळ्यात पिकाचे उत्पादन, उत्पादकता व गुणवत्ता यांच्या मात्रेत लक्षणीय सुधारणा होते. चांगल्या गुणवत्तेमुळे चांगला बाजारभाव मिळतो.
६. लागवडीस अयोग्य जमिनीवर शेडनेटगृह उभारून चांगले उत्पादन मिळविता येते.
७. उन्हाळ्यात पिकांची उगवण टक्केवारी वाढते.

शेडनेटचे प्रकार

शेडनेटगृहाचे छताच्या आकारानुसार साधारणपणे खालीलप्रमाणे प्रकार आहेत.
अ) सपाट छताचे शेडनेटगृह (फ्लॅट रुफ)
ब) गोलाकार छताचे शेडनेटगृह (डोमशेप रुफ)

शेडनेटगृहासाठी जागेची निवड

शेडनेटगृह उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर जागेची निवड चुकली तर शेडनेटगृहातील पीक लागवड अपयशी ठरू शकते. त्यासाठी जागेची निवड करताना खालील बाबींचा अवलंब करणे आवश्यक असते.

१. जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. निचरा होणारी जमीन नसेल तर शेडनेटगृहाभोवती चर अथवा दांड काढावा की ज्यातून पाण्याचा निचरा होईल व शेडनेटगृहामध्ये जमीनीतील पाण्याची पातळी पिकाच्या मुळांच्या खाली राहील.
२. पाणथळ जागा शेडनेटगृहासाठी निवडू नये व तसेच शेडनेटगृहाची जागा खोलगट ठिकाणी नसावी.
३. पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ दरम्यान व क्षारतेचे प्रमाण कमी एल१ााहेी/ला असलेल्या जागा योग्य असतात..
४. पाणी पुरवठ्याची सुविधा जवळपास असावी. तसेच विद्युतपुरवठ्याची सुविधा असावी.
५. इमारती, मोठे वृक्ष, इ. ची सावली शेडनेटगृहावर पडणार नाही अशी जागा निवडावी.
६. निवडलेल्या जागेत भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते.

शेडनेटगृहाची दिशा

शेडनेटगृह उभारताना गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची दिशा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) अशी ठेवावी. यामागचा हेतू म्हणजे पश्चिमेकडून वाहणारा वारा सहजपणे पूर्वेकडून निघून जाण्यासाठी शेडनेटगृहाची लांबी दक्षिणोत्तर घेणे योग्य असते. मात्र सपाट शेडनेटगृहासाठी कुठलीही दिशा ठेवली तरी चालते.

शेडनेटगृहात लागवडीचे माध्यम : शेडनेटगृहात भाजीपाला लागवडीसाठी लागणारी जमीन नेहमीच्या शिफारशीनुसार असावी. मात्र ती पाण्याचा निचरा असणारी असणे आवश्यक आहे. निचरा होणारी जमीन नसल्यास व तसेच उच्च मुल्यांची घ्यावयाची पिके असल्यास लाल माती (३०%), शेणखत (३०%), वाळू (३०%) व भाताचे तुस (१०%) हे एकत्र करून त्यापासून लागवडीचे माध्यम तयार करावे. या माध्यमापासून पिकाच्या अंतराप्रमाणे गादीवाफे तयार करावेत. मातीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. मातीतील क्षारांचे प्रमाण अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी असावे.

लागवडीच्या माध्यमाचे निर्जंतुकीकरण

जर शेडनेटगृहात विविध पिकांची लागवड करावयाची असेल तर गादीवाफे बनविण्याच्या आधी सर्व मातीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. त्याकरिता १०० चौ.मी. भागासाठी ७.५ ते १० लिटर फॉरमॅलिन आम्ल घेऊन ते त्याच्या १० पट पाण्यात टाकावे. या मिश्रणाने जमिनीवर स्प्रे किंवा ड्रेचिंग करावे. नंतर काळ्या प्लास्टिक पेपरने सात दिवस हवाबंद झाकुन ठेवावे. त्यानंतर १०० लिटर प्रति चौ. मीटर या दराने चांगले पाणी वापरून जमीन फ्लश करून घ्यावी कि जेणेकरून जमिनीतील आम्लयुक्त पाण्याच्या निचरा होऊन जमीन आम्ल विरहित होईल. वाफसा आल्यानंतर अपेक्षित मापांप्रमाणे गादी वाफे तयार करून त्यावर रोपाची लागवड करावी. याशिवाय, जमिनीच्या निर्जंतुकीकरणासाठी मिथील ब्रोमाईड २५ ते ३० ग्रॅम/चौ. मी. किंवा बासामीड ३० ते ४० ग्रॅम / चौ.मी. या प्रमाणात वापरता येते.

शेडनेटगृहात लागवडी योग्य पिके

शेडनेटगृहाचा उपयोग प्रामुख्याने उच्च मुल्यांची भाजीपाला पिके व फुलपिके यांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. तसेच बिगर हंगामी पिके घेण्यासाठी सुध्दा शेडनेटगृहाचा उपयोग होतो. मुख्यतः खालील पिके शेडनेटगृहात लागवडीसाठी घेतली जातात.

१. ढोबळी मिरची
२. टोमॅटो
३. काकडी
४. ब्रोकोली
५. लेट्यूस
६. अन्थुरियम
७. इतर भाजीपाला पिके जसे की काकडी, वाटाणा, फुलकोबी, कोबी, वांगी, मिरची भेंडी इ.
८. सर्व भाजीपाला पिकांच्या रोपवाटीका
९. सर्व फळझाडे पिकांच्या रोपवाटीका
१०. भाजीपाला पिकांचे बियाणे घेण्यासाठी
११. ऑर्किड

शेडनेटगृहाची उभारणी

शेडनेटगृह उभारतांना खालील बाबी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते.
१. शेडनेटगृहाचे फाऊंडेशन (पाया)
२. शेडनेटगृहाची फ्रेम (सांगाडा)
३. सांगाडा जोडण्यासाठी नटबोल्ट व क्लॅम्प
४. शेडनेट (जाळी)
५. शेडनेट बसविणे.
६. शेडनेटगृहात जमिनीलगत यु.व्ही. फिल्म लावणे (स्कटींग)

शेडनेट हाऊस उभारणीसाठी तांत्रिक निष्कर्ष

१. खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार ११२ फूट असावा. त्याच मधोमध जी. आय.चा. फाऊंडेशन पाईप बसवून त्यास होल्ड फास्ट बार टाकून १:२:४ प्रमाणात सिमेंट, वाळू, खडी घेऊन तयार केलेले सिमेंट क्राँक्रीट भरावे.
२. शेडनेट हाऊसचे विविध मॉडेल व आकारमान प्रामुख्याने राऊंड टाईप व फ्लॅट टाईप आहेत. तसेच आराखड्याप्रमाणे बाजूची उंची व मध्यभागाची उंची ठेवण्यात यावी. शेडनेट हाऊससाठी आवश्यकतेनुसार ५० किंवा ७५ टक्के शेडींगची शेडनेट वापरण्यात यावी. शेडनेटचे फिटींग अ‍ॅल्युमिनियम चॅनेल पट्टीमध्ये स्प्रिंगच्या सहाय्याने केलेले असावे.
३. शेडनेट हाऊसमध्ये स्प्रिंकलर किंवा ड्रिप इरिगेशनची सोय केलेली असावी.
४. शेडनेटहाऊसला सर्व बाजूंनी जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत स्कर्टिंगसाठी १०० जी.एस.एम. च्या जाओ फॅब्रिक फिल्मचा उपयोग करण्यात यावा.
५. शेडनेट व पॉलीहाऊसच्या आतून किडरोधकनेट लावणे आवश्य आहे. कारण त्यामूळे फुले व भाजीपाला पिकांवर येणार्‍या किडीचा तसेच किडीमार्फत प्रसार होणार्‍या रोगाच्या प्रसारास जबाबदार असणार्‍या किटकांच्या प्रवेशास अवरोधन होऊन विशेषतः विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी करता येणे शक्य होईल.
६. शेडनेट हाऊस उभारणीसाठी वापरण्यात येणार्‍या साहित्यापैकी ज्या साहित्यांचे आयएसआय/बीआयएस मानके निश्चित करण्यात आलेली आहेत ते साहित्य त्या मनकाप्रमाणे असणे आवश्यक आहे.
७. मोनो फिलामेंट नेट हे विविध प्रकारच्या टेपनेट पेक्षा सरस असल्यामुळे प्रति चौ.मी. मोनोनेटला टेपनेटच्या तुलनेत जास्तीचा खर्च येत असल्याची बाब विचारात घेवून ऐच्छिक खर्चामध्ये प्रति चौ.मी. रु.१० हा अधिकचा दर देय राहिल. मोनो फिलामेंटच्या वापरामुळे हरितगृहाची/शेडनेटची टिकाऊ क्षमता, योग्य प्रमाणात पिकांना प्रकाश व सावली मिळणे. तसेच गारपीट, पक्षी व धूळीपासून सुरक्षितता मिळत असल्यामुले मानो फिलामेंट वापराकरिता अधिकचा दर ऐच्छिक स्वरुपात मान्य करण्यात आलेला आहे.
८. सुक्ष्मसिंचन शेडनेटहाऊस मधील सुक्ष्मसिंचनाकरिता कॉस्टनॉर्ममध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.
९. शेतकर्‍यांची मागणी व गरज विचारात घेऊन या पुर्वीची शेडनेट हाऊस प्रकारातील काही मॉडेल्सची उंची वाढविण्यात येऊन काही मॉडेल्स् नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
१०. महाराष्ट्रातील हवामान विभाग, तांत्रिक गरज व योजना राबविण्यातील सुलभता विचारात घेऊन हरितगृह व शेडनेट हाऊस प्रकारामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
११. हरितगृह व शेडनेटहाऊस उभारणीसाठी पुरवठादारांकडून प्राप्त साहित्य खरेदीच्या बीलांमध्ये सर्व्हिसटॅक्स व व्हॅट यांची रक्कम नमूद केलेली असल्याची अनुदान विवरणा पूर्वी संबंधित अधिकार्‍याने खात्री करून घ्यावी.
१२. हरितगृह व शेडनेट हाऊस पूर्ण कार्यान्वीत झाल्यानंतरच देय अनुदान अदा करण्यात येते.
१३. जास्त उंचीच्या शेडनेटहाऊसचे फाउंडेशन पाईपची साईज – ४८ एम.एम. व कालॅमची साईज ६० एम.एम. असावी.
१४. राऊंड टाईप व जास्त उंचीच्या फ्लॅट टॉप शेडनेट हाऊसची ग्रीड ६ मि. ु ४ मि. असावी. कमी उंचीच्या फ्लॅट टॉप शेडनेट हाऊसची ग्रीड ६ मि. ु ६ मि. असावी.
१५. राउंड टाईप शेडनेट हाऊसची उंची ४ मि. व ५ मि. व फ्लॅट टाईप शेडनेटहाऊसची उंची ३.२५ मि. व ४ मि. ठेवण्यात यावी.

शेडनेटहाऊस उभारणीसाठी निश्चित केलेले खर्चाचे मापदंड राऊड टाईप व फ्लॅट टाईप प्रकाराच्या शेडनेटहाऊसच्या उभारणीसाठी आकारमानानुसार व विविध मॉडेल्सनुसार प्रति चौ.मी. क्षेत्रासाठी बिलाप्रमाणे प्रत्यक्ष येणार्‍या खर्चाच्या ५०% रक्कम किंवा महत्तम मापदंडाप्रमाणे येणार्‍या खर्चाच्या ५०% रक्कम यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे.

(साभार : कृषिदर्शनी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

Exit mobile version