खरिपाच्या पिकांवर गोगलगायींचा हल्ला; असा करा बंदोबस्त

Snails on crops

पुणे : उशिरा का होईना पण सर्वत्र होत असलेल्या दमदार पावसाने राज्यभरात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र काही जिल्ह्यांमध्ये पिकांवर नवीनच संकट ओढवले आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची उगवणही झाली आहे. पण पीक कोवळे असतानाच गोगलगायी त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली पिके पूर्णत: नष्ट होतच आहेत शिवाय उर्वरित पिकांची वाढ आणि उत्पादन यावर देखील विपरित परिणाम होत आहे.

सद्य परिस्थितीमध्ये बर्‍याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी गोगलगायींना वेळीच ओळखून उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी तज्ञांकडून देण्यात आला आहे. दरम्यान राज्य सरकारने पिकांचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

गोगलगायी निशाचर असल्याने रात्री सोयाबीन, मका, कोबी, घास, फ्लॉवर, टॉमॅटो ही कोवळी पिके फस्त करतात. एक गोगलगाय एका रात्रीत पन्नास ते शंभर ग्रॅम वजनाचे शेतातील पिकाची पाने खातात. यामुळे घास, कोबी, सोयाबीन, मका पिके धोक्यात आली आहेत. या गोगलगायी एका वेळी दोनशे ते तीनशे अंडी घालतात. यामुळे गोगलगायींची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होवून त्याचा प्रादूर्भाव देखील वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

असे करा गोगलगायींचे नियंत्रण
शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी देखील उपयोगी ठरते.

असे करा फळबागांचे रक्षण
फळबागेमध्ये झाडांच्या खोडास १० टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे. शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या (स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.

Exit mobile version