सौर वाळवण यंत्राने महिलांना मिळाला रोजगार  

Solar dryer

औरंगाबाद : ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा हा उदात्त हेतूने सौर वाळवण यंत्र व त्यासोबत भाजीपाल्याचे छोटे तुकडे करण्यासाठी लागणारे जे यंत्र आहेत ते घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे औरंगाबाद जिल्ह्यातील 241 महिलांनी अर्ज केले होते या महिलांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून एक कोटी 92 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वाया जाणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला एक नवीन गती मिळण्याची शक्यता आहे.

सौर वाळवण यंत्र व त्याच्या अन्य यंत्रसामुग्रीसाठी २४१ महिलांना एक कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मंजूर करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला नवी गती मिळण्याची शक्यता आहे. गाजर, भेंडी, कांदा, लसूण आदी पदार्थ वाळवून त्याच्या विक्रीसाठी ‘सायन्स फॉर सोसायटी’ या कंपनीमार्फत  ग्रामीण महिलांना रोजगार देण्यासाठी घेण्यात आलेल्या उपक्रमाला आता महाराष्ट्र बँकेकडून सहकार्य मिळत आहे.

२००८ साली वैभव तिडके या बीडच्या तरुणाने सौर वाळवण यंत्र तयार केले होते. आपल्या शेतीप्रधान देशात शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाअभावी दरवर्षी तब्बल ६० लाख दशलक्ष टन फळे-भाजीपाल्याची नासाडी होत असते. याच समस्येने वैभव तिडके व त्यांच्या सहकारी मित्रांना संशोधन करण्यास प्रवृत्त केले आणि त्यातूनच नाशवंत म्हणून अल्प काळ टिकण्याची क्षमता असलेल्या फळे आणि पालेभाज्यांना किमान वर्षभर सुरक्षित ठेवता येईल या हेतूने त्यांनी सौर वाळवण यंत्र विकसित केले.

सौर वाळवण यंत्राच्या आधारे भाज्या वाळवून देण्याचा व्यावसाय महिला करणार आहेत. वाळवलेल्या पदार्थाचे आयुष्य अधिक असते हे पारंपरिक ज्ञान वापरुन उभारण्यात येणाऱ्या या व्यावसायामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात अधिक पैसे मिळू लागले आहेत. वाळविलेले पदार्थही ही कपंनीच विकत घेणार आहे. देशभरात २० हजारांहून अधिक महिलांना काम उपलब्ध करून देणाऱ्या या कपंनीची उलाढाल आता १७.८ कोटी रुपयांपर्यंत असून ती पुढील वर्षांत २२ कोटी रुपयांपर्यंत असू शकेल.

कंपनीसोबत 241 महिला जोडल्या गेल्या असून त्यांना एक कोटी 92 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यामध्ये तीन यंत्राची आवश्यकता असते. म्हणजेच भाज्यांचे तुकडे करणे, कच्चामाल स्वच्छ करणे  व तो वाळवणे यासाठी या यंत्राची आवश्यकता असते. या तीन यंत्रांसाठी प्रति महिला 90 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या आयुष्यात खरोखरच बदल होणार असून महिलांच्या हाताला काम मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवा आकार मिळेल अशी आशा आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version