पुढचे तीन दिवस विदर्भात थंडी वाढणार

thandi

नागपूर : राज्याच्या काही भागात गारवा कमी झाला असला तरी दोन दिवसांनंतर तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातही जानेवारी महिन्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट होती. संपूर्ण राज्याच्या किमान तापमानाचा पारा मोठय़ा प्रमाणावर घसरल्याने हुडहुडी भरली होती. तर काही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात सध्या सकाळी थंडी तर दुपारी उकाडा, असं चित्र पाहायला मिळतंय. हवामानशास्त्र विभागानं याची शक्यता गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वीच वर्तवली होती. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग सोडला, तर इतरत्र किमान आणि कमाल तापमानातला फरक वाढलाय. पुढचे तीन दिवस विदर्भात थंडी वाढणार असून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडी राहू शकते. तर येते पाच दिवस राज्यातलं हवामान प्रमुख्यानं कोरडं राहण्याची दाट शक्यता असल्याचंही हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय.

सध्या उत्तरेकडील थंडीची लाट ओसरली आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत थंडीचा कडाका कायम आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र किमान तापमान सारसरीजवळ आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत गारवा घटला आहे. पण पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतासह मध्य प्रदेश ते छत्तीसगडपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे. विदर्भात त्याचा किंचित परिणाम होऊ शकतो. ही स्थिती निवळल्यानंतर मात्र पुन्हा गारवा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीची पिके जोमात आली होती. मात्र, आता अधिकच्या थंडीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ज्वारीची कणसे भरली असून, त्यालाही या थंडीचा फटका बसणार आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version