शेतमजूर मिळत नाहीत आणि डिझेलचे दरही कमी होत नाही; सांगा शेती मशागत करायची कशी?

diesel

पुणे : शेतात नांगरणी, तिरी, पाळी, कोळपणीच्या मशागतीचे कामे सुरू झाली आहेत. मात्र, डिझेलच्या सततच्या भाववाढीचा फटका सरळ शेतीच्या मशागतीस बसत आहे. डिझेलच्या दरात सतत भाववाढ होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने करावयाची मशागत यावर्षी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांपर्यंत गेली आहे. तसेच शेतात निघणाऱ्या शेतीमालाला मोंढ्यात नेणाऱ्या वाहतुकीचाही दर वाढल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

शेतातील तुरीची खळे आटोपली असून, कपाशीची देखील वेचणी झाली आहे. सद्यस्थितीत पेरणीपूर्वीचा हंगाम सुरू असल्याने व उन्हाळ्यात उन्हात शेती चांगली भाजल्यास मृग नक्षत्रात पडणारा पाऊस नांगरटीमुळे शेतात मुरल्या जातो. या कारणाने अंबड तालुक्यात सर्वत्र शेतीची नांगरणी करण्यात शेतकरी गुंतला आहे.

बैलांच्या सहाय्याने बळीराम नांगरणी करण्याऐवजी ७० टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करूनच शेतीची मशागती करताना दिसून येत आहेत. मागील वर्षी १ हजार ३०० रुपये असलेला ट्रॅक्टर नांगरणीचा भाव यावर्षी १ हजार ५०० च्या पुढे गेला आहे. शेतकऱ्यांच्या मागे निसर्गाच्या विविध कोपाबरोबरच शासनाच्या डिझेल दरवाढीचा फटकादेखील बसत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने करावयाची मशागत महागली आहे. ट्रॅक्टर मालकांनी शेती मशागतीचे हे दर वाढविले आहेत. सध्या शेतात तूर, हरभरा, गहू काढण्याचा हंगाम सुरू आहे. अंदाजे १२० ते १३० रुपये एका कट्या मागे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

शेतीची कामे ट्रॅक्टर मळणीयंत्र, रोटावेटर, हार्वेस्टर याद्वारे होत आहे. या यंत्रांना पेट्रोल व डिझेलची गरज असते. परंतु आता डिझेल व पेट्रोलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर नांगरणीसाठी तासाला सातशे ते आठशे रुपये घेत आहेत. ट्रॅक्टर, मळणी यंत्र, हार्वेस्टर, जेसीबी यांचेही दर वाढले आहेत. सध्या परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी केली जात आहे.

आर्थिक कोंडी

नांगरणीसाठी तूर, बाजरी, कपाशीचे शेत असल्यास १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपये भाव आहे. तसेच उसाचे शेत असल्यास २ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव आहे. तिरिसाठी एकरी १ हजार २०० रुपये, रोटाव्हेटरसाठी एकरी १ हजार १०० ते १ हजार ५०० रुपये, पाळी व कोळपणीसाठी एकरी ८०० रुपये ते १ हजार २०० मोजावे लागत आहे. आता डिझेलचे भाव ९५ रुपये लिटर पर्यंत गेल्याने नांगरणीची दरवाढ मागील वर्षीपेक्षा ३०० ते ५०० रुपयाने जास्तच वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी असो अथवा जेसीबी मशीन द्वारे पाईप लाईन खोदणे असो, यांच्या दरात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. एक तास काम करण्यासाठी जेसीबीला तब्बल १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर तलाव खोदण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या मशीनला एका तासाला ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनासी झाली आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version