नांदेड : मराठवाड्यातील काही भागात बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्याने आंब्याचे व संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात बुधवारी रात्री झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बुधवारी सायंकाळी नांदेड शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील हरभरा, ज्वारी, गहू आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून गारपीटमुळे टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
आधीच खरिपात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला होता त्यातून कसाबसा सावरत तो रब्बी हंगामाकडे वळला. पोषक वातावरण असल्याने रब्बी हंगामातून खरीप हंगामाची भरपाई काढण्याचे स्वप्न बळीराजा सजवीत असतानाच निसर्गाचे हे रौद्ररूप शेतकऱ्यांचे कंबरडे मोडू पाहत आहे. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे मायबाप सरकारने तातडीने पंचनामे करत कुठल्याही प्रकारच्या अटी व शर्ती न लावता सरळ नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी अशी मागणी यावेळी बघायला मिळत आहे.
अवकाळी पावसाचा फटका नांदेड शहरासह देगलूर, लोहा, कंधार बिलोली, धर्माबाद, उमरी, भोकर, अर्धापूर, मुखेड तालुक्यात कमी अधिक प्रमाणात बसला आहे. परभणी जिल्ह्यातही आठही तालुक्यांना बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. गारपीटीमुळे काढणीला आलेले गहू, ज्वारी, हरबरा या पिकांसह संत्री आणि आंबा फळांचे मोठे नुकसान झाले. परभणी तालुक्यासह मानवत, सेलू, पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि जिंतूर या तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात गारपीट, पाऊस आणि वादळी वाऱ्याचा कहर बरसला. परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाल्याने आंबा आणि संत्री या फळांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात ज्वारी, गहू तसेच हरभऱ्याचे पीक अक्षरशः आडवे झाले आहे.
रब्बी पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च महिना अंतिम टप्प्यात आला असतानाही अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सायंकाळी सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात गुरूवारी पहाटेपर्यंत बरसत होता. अनेक ठिकाणी गारपीट झाली. शिवाय खंडित झालेला विद्यूत पुरवठा गुरुवारी दुपारनंतर सुरू झाला. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा :