नवी दिल्ली : एक क्विंटल कापूस उत्पादन करण्यासाठी सुमारे ८००० रुपये खर्च येतो. यंदाच्या पावसाच्या लहरीपणाचा फटका कापूस पिकाला बसला आहे. यामुळे त्यांना अतिरिक्त मजूर आणि पीक देखभालीसाठी जास्त खर्च करावा लागला आहे. अतिपावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे चालू हंगामात कापसाला १२ हजार रुपयांचा हमीभाव (एमएसपी) देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. या मागणीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान निदर्शने करण्याचा इशारा कापूस उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
यंदा अतिपावसाचा सर्वच पिकांना फटका बसला आहे. यात कापूस उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी रडकुंडीला आले आहेत. गत हंगामातही कापसाचे नुकसान झाले होते मात्र कापसाला विक्रमी दर मिळाल्याने झालेले नुकसान काही प्रमाणात भरुन निघाले. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नाही. उत्तर व दक्षिणेकडील राज्यांनाही याचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.
अशी आहे भारतातील परिस्थिती
यावेळी देशातील कापसाचे क्षेत्र ७ टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबरपर्यंत सुमारे १२६ लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कापसाचे क्षेत्र ११७ लाख हेक्टर होते. मंडईंमध्ये कापसाची आवक वाढल्याने स्पॉट मार्केटमध्ये कापसाच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात कापसाचे भाव सुमारे ४ टक्क्यांनी कमी होऊन ४३ हजार रुपये प्रति गाठी झाले आहेत. यंदा गुजरातमध्ये ९१ लाख गाठी तर महाराष्ट्रात ८४ लाख गाठी कापूस तयार होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशात १९५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख गाठींनी वाढ झाली आहे. उत्तर भारताबद्दल बोलायचे झाले तर पंजाबसह इतर राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन सुमारे ५० लाख गाठी असेल.