पुणे : सध्या जगभरात गहु टंचाईचा विषय चांगलाच चर्चेत आहे. भारतात गहु टंचाई होवू नये यासाठी भारताने निर्यात बंदी केली आहे. मात्र हा आपल्या बातमीचा विषय नसून आम्ही आज गव्हाच्या एका अशा वाणाविषयी माहिती देणार आहोत. ज्या वाणामुळे गव्हाचे हेक्टरी ७५ क्विंटल उत्पादन घेतल्याचा विक्रम एका शेतकर्याने केला आहे.
भारतात गव्हाच्या अनेक जातींचे उत्पादन केले जाते आणि प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, परंतु काही वाण आहेत ज्यांचे उत्पादन शेतकर्यांना खूप फायदेशीर ठरू शकते. असाच एक प्रकार म्हणजे ‘पूजा तेजस’ (पुसातेजस). मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील चिल्लोड पिपलिया गावातील शेतकरी वल्लभ पाटीदार यांनी या वाणामुळे हेक्टरी ७५ क्विंटल उत्पादन घेतले आहे.
गेल्या २ वर्षांपासून ते पुसा तेजस एचआय ८७५९ या जातीची पेरणी करत आहोत. या जातीतील गव्हाची उत्पादन क्षमता आणि प्रतिकारशक्ती इतर गव्हाच्या वाणांच्या तुलनेत खूप चांगली आहे. त्यामुळेच यंदा गव्हाच्या या जातीचे ७५ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळाल्याचे पाटीदार यांनी सांगितले. या वाणाची माहिती त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र मंदसौर येथून मिळाली आहे. गव्हाच्या जातीचे प्रमाणित बियाणेही त्यांना कृषी विज्ञान केंद्रानेच उपलब्ध करून दिले होते.