मालेगाव : जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, सटाणा व येवला या तालुक्यात साधारण 34 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर मागील हंगामात कापसाची लावगड करण्यात आली असून त्यास चांगला भाव मिळाल्याने या क्षेत्रात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने एप्रिल महिन्यात प्रत्येक कापुस उत्पादक गावात ‘फरदड मुक्त गांव’ ही संकल्पना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कापुस उत्पादनाशी निगडीत सर्व यंत्रणा, बियाणे उत्पादक कंपन्या, किटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्र, जिनींग प्रोसेसिंग मिल यांच्या सहभागाने फरदड निर्मुलन मोहिम राबविण्यात यावी, असे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मागील वर्षी लांबलेला पाऊस व अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कापुस पीक जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ‘फरदड मुक्त गांव’ मोहीम राबवून शेतात ठेवलेले होते. लांबलेला कापुस हंगाम व कापुस पिक शेतात राहिल्यामुळे किडीचा जीवनक्रम अखंडित राहण्याची शक्यता असल्यामुळे चालु खरीप हंगामात प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव नियंत्रणात ठेवणे व चालु वर्षी होणारा प्रार्दुभाव टाळण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात जमीनीची खोल नांगरटी करून कापुस पिकाची पुर्व हंगामी मे महिन्यातील लागवड टाळण्यात यावी. तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत करण्यासाठी शेत 5 ते 6 महिने कापुस विरहित ठेवल्यास डिसेंबर नंतर खाद्य न मिळाल्यास बोंडअळी सुप्त अवस्थेत जाते. परंतु शेतकऱ्यांनी फरदड घेतल्यास किडीचे जीवनचक्र अखंडीत चालू राहण्यास मदत होऊन पुढील हंगामात किडीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे. तसेच कापसाच्या पऱ्हाट्या बांधावर ठेवू नये व शेत व बांध स्वच्छ ठेवावेत. तसेच पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा थ्रेडरद्वारे जमीनीत गाडाव्यात अथवा जाळाव्यात, कापासाची वेचणी झाल्यानंतर हंगामाच्या शेवटी शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरणासाठी सोडावीत, त्याचप्रमाणे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत
वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची एकाच वेळी लागवड करण्यात यावी, असेही उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मालेगाव तालुक्यात मालेगाव 21000, नांदगाव 13000, सटाणा 100 असे एकूण 34 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर मागील खरीप हंगामात लागवड झालेली होती. चालू हंगामात कापसास चांगला भाव मिळाल्याने कापुस लागवड क्षेत्रात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षात गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव शासकीय कृषी विभाग व खाजगी संस्था, कृषि विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, जिनींग प्रेसींग मिल बियाणे विक्रेते व बियाणे कंपनींच्या सहकार्याने गुलाबी बोंडअळी प्रार्दुभाव नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. त्यामुळे कापुस उत्पादक गावात फरदड मुक्त गाव संकल्पना राबविण्याचे आवाहन, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.