आंबा हा फळांचा राजा आहे त्यात हापूस म्हटले की आंबा प्रेमींच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही.
हंगामाच्या सुरुवातीपासून अनेक अडथळ्यांवर मात केल्यानंतर आता हापूस स्थानिक बाजारपेठेत पोहोचला आहे. यापूर्वी हापूस आंबा फक्त मुख्य बाजारपेठेत पोहोचला होता, मात्र आता या आंब्याची आवक रत्नागिरी जिल्ह्यातील पावस, गणेशगुळे, गणपतीपुळे या सर्व स्थानिक बाजारपेठांमध्ये सुरू झाली आहे. यंदा नुकसान होऊनही हापूस आंब्याचे भाव जैसे थेच आहेत. नुकसानीनंतर भावात घसरण अपेक्षित होती, मात्र हापूस आंब्याने आपला भाव कायम ठेवला आहे. सध्या डझनभर हापूसची किंमत 1200 ते 2 हजार रुपयांपर्यंत आहे.
यंदा हापूस आंबा बाजारपेठेत उशिरा पोहोचला आहे. आंब्याचे दर उतरण्यास वेळ लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी हापूस आंब्याच्या 25 हजार पेट्या वाशी मंडईत पोहोचल्या आहेत. बाजारभाव 1500 ते 4000 रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भावात 500 ते 700 रुपयांनी वाढ झाली आहे.
हापूस आंब्याच्या उत्पादनात घट
या हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे आंब्याच्या बागा अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा दर चढेच राहण्याची शक्यता आहे. हापूसचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. येथे रत्नागिरी, रायगड आणि कोकण विभागात सर्वांत जास्त उत्पादन होते. यंदा कमी उत्पादनामुळे शेतकरी नाराज झाला होता, मात्र चांगला भाव मिळाल्याने नुकसान भरून काढले जात आहे.
दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्याने हापूस खाणाऱ्यांमध्ये विशेष उत्सुकता असते. निदान कोकणात फळांचा राजा मार्चच्या सुरुवातीला येतो. मात्र यंदा निसर्गाच्या प्रकोपाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. सुरवातीला विक्रमी दर असतील पण हंगामाच्या शेवटी तो काहीसा खाली येईल, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कीड आणि रोगांचाही फळांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने यंदा निर्यातीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, गेल्या आठवड्यातच पुण्यातून हापूसची अमेरिकेत निर्यात झाली. अशा स्थितीत आता उत्पादनात घट झाली तरी वाढलेल्या दरातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, हे पाहावे लागेल.
हापूस आंब्याचा दर
मुख्य बाजारपेठेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. रत्नागिरीजवळील गणेशगुळे आणि गणपतीपुळे स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू झाली आहे, मात्र डझनचा भाव १२०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे, त्यामुळे काही सर्वसामान्य ग्राहक इच्छा असूनही खरेदी करत नाहीत. तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तूर्तास, पैसे असलेल्यांनाच त्याची चव चाखता येईल.