द्राक्ष निर्यातीसाठी ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी पण मार्केटिंगसाठी तज्ञांचा ‘हा’ आहे सल्ला…

सोलापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेवू लागले आहेत. याची प्रचिती निर्यातीसाठी नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीवरुन येते. सरकारी दप्तरी असलेल्या नोंदीनुसार, यंदा राज्यातून तब्बल ४३ हजार शेतकर्‍यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

देशांतर्गत द्राक्षाला चांगले मार्केट असले तरी अनेक प्रयोगशिल शेतकरी निर्यातीवर जास्त भर देतात. निर्यातीतून राज्यात दरवर्षी २२०० ते २३०० कोटी रुपये मिळतात. गतवर्षी २०-२१ मध्ये ४५ हजार शेतकर्‍यांची नोंदणी झाली होती. यापैकी १३०० शेतकर्‍यांची दोन लाख ४६ हजार मे. टन द्राक्ष निर्यात झाली होती.

महाराष्ट्रातून विशेषतः नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षं तयार केली जातात. यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३५ हजार शेतकर्‍यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ हजार, पुणे जिल्ह्यातील १३००, अहमदनगर जिल्ह्यातील ९५०, सोलापूर जिल्ह्यातील ७००, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६००, सातारा जिल्ह्यातील ५०० व लातूर जिल्ह्यातून १५० शेतकर्‍यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

थंडी कमी झाल्यानंतर उन्हाचा कडाका सुरू होईल व निर्यातीला चालना मिळेल, या अपेक्षेने राज्यातील दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रभावात युवक शेतकरीही द्राक्ष शेतीला जोडले असले तरी विक्रीसाठी देशभरात नेटवर्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या द्राक्ष निर्यातीला म्हणावा तितका वेग आला नसला तरी गुणवत्तेचा माल तयार करण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे.

देशभरात द्राक्षाला ग्राहक आहे; पण शेतकर्‍यांनर द्राक्ष विक्रीसाठी ‘नेटवर्क’ तयार करण्यावर भर दिला पाहिजे. यासह गुणवत्ता, ग्रेडिंग, पॅकिंग चांगली केली तर इतर राज्यांत मार्केटिंगची अडचण येत नाही, असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.

Exit mobile version