Start Up : शेतकऱ्याच्या मुलाने बनवलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची १५ राज्यांमध्ये विक्री अन् लाखोंची कमाई

औरंगाबाद : आजची तरुण पिढी शेतीपासून दुर जात असल्याबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुणांनी उच्च पदावरील नोकरीचा राजीनामा देवून शेती करण्याच्या निर्णय घेतल्याच्या अनेक बातम्या वाचण्यात आल्या. काही तरुणांनी अ‍ॅग्रीकल्चर स्टार्टअपच्या माध्यमातून प्रगतीचा नवा मार्ग शोधला. अशाच होतकरु तरुणांपैकी एक म्हणजे योगेश गावंडे!

औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे (Yogesh Gavande Spray Pump) या तरुणाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध लावला असून गेल्या ४ वर्षामध्ये त्याने ४०० हून अधिक मशीन बनवल्या असून १५ राज्यांमध्ये त्या पाठलेल्या आहेत. त्याने निओ स्प्रे पंप हे सुरवातीला महाविद्यालयातील एका प्रोजेक्टसाठी बनविण्यात आले होते. आता त्याची मागणी वाढत आहे. या यंत्रामुळे वेळेची बचत तर होतेच मात्र फवारी करणार्‍या शेतकर्‍याला विषबाधेचा धोकाही नसतो. यामुळे या यंत्राला मोठी मागणी आहे.

अशी झाली सुरवात

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणाचे धडे घेत असताना योगेश गावंडे यांनी एका कॉलेजच्या एका प्रोजेक्टमध्ये हे यंत्र साकारले होते. यासाठी त्यांना केवळ ३ हजार ८०० रुपये खर्च आला होता. स्वयंचलित फवारणी यंत्राचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी या प्रायोगिकतत्वार केलेल्या प्रकल्पाला उद्योगाचे स्वरुप देण्याचे ठरवले. त्यांनी चिखलठाण्यातच शेड उभारुन कॉलेजच्या ४ वर्षात ४०० स्वयंचलित फवारणी यंत्र बनवले व यामधून तब्बल २० लाखांची उलाढाल केली.

स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून अशी होते फवारणी

वाहनांमधील आयसी इंजिनमध्ये पिस्टन रेसिप्रोकेट होते. वाहनाला चेन असल्यामुळे दोन्ही चाके ही फिरतात. यामध्ये उलटी प्रक्रिया आहे. चाक असणार्‍या एका लोखंडी स्टँडवर खताची पिशवी लटकवता येते. यंत्र सुरु झाले की यंत्रावरील दांडा खाली-वर करण्याची प्रक्रिया सुरु होते. आणि नोझलमधून खत फवारणी केली जाते. या फवारणी यंत्राला निओ स्प्रे पंप असे नावही त्यांनी दिले आहे.

Exit mobile version