पुसा : भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा येथे १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ज्या शेतकर्यांनी आपल्या सुधारित शेतीच्या बळावर गेल्या काही वर्षांत आपले उत्पन्न दुप्पट केले आहे अशा शेतकर्यांच्या प्रतिनिधींना या संमेलनात आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ३०० हून अधिक स्टार्टअप स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या रफ्तार प्रकल्पांतर्गत एकूण ३००० हून अधिक स्टार्टअप उद्योजकांना कृषी क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील तीन वर्षांत एकूण ५००० स्टार्टअप उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे. कृषी क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्या स्टार्टअप्सच्या यशाचा उपयोग करण्यावर भर दिला जाईल. देशात स्टार्टअप विकसित करण्यासाठी सरकारने एक हजार कोटी रुपयांच्या सीड फंडाची तरतूद केली आहे.