नाशिक : देशभरातील शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशी योजना आहे, ज्याद्वारे शेतकर्यांना आर्थिक मदत दिली जाते. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत ११ हप्त्यांचे पैसे सरकारने वर्ग केले आहेत. तर १२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. याविषयी महत्त्वाची अपडेट आली आहे.
दरवर्षी या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे १ एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवले जातात. त्याच वेळी, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान पाठविला जातो, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान पाठविला जातो. यावर्षी केंद्र सरकारच्या माहितीनुसार, १२ व्या हप्त्याचे पैसे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएम किसान योजनेसाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही ई-केवायसी न केल्यास, तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागू शकते. ई-केवायसीची तारीख ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ई-केवायसी कसे करावे?
सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल, तेथे ई केवायसी या बटनावर क्लिक करा.
आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.