पुणे : शेतीत यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, याचे महत्त्व आता शेतकर्यांनाही पटले आहे. शेतात कमी वेळेत व कमी श्रमात जास्तीत जास्त कामे करण्यासाठी यांत्रिकीकरण हाच सर्वोत्तम मार्ग असल्याने ट्रॅक्टर विक्रीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात जुलै २०२२ मध्ये ५९ हजार ५८६ ट्रॅक्टर विक्री झाल्याची नोंद केली आहे. यामध्ये सर्वात जास्त ट्रॅक्टर विक्री ही उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये झाली आहे. ट्रॅक्टर विक्रीच्या बाबातीत महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशमध्ये जुलैमध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर विक्री झाली आहे. तिथे ११ हजार २८४ ट्रॅक्टर विक्री झाली आहे. तर जुलै २०२१ मध्ये तिथे १२ हजार ३१० ट्रॅक्टर विक्री झाली होती. तर दुसरा क्रमांक हा राजस्थानचा लागतो. जुलै २०२२ मध्ये राजस्थानमध्ये ९ हजार १५२ ट्रॅक्टर विक्री झाली आहे. ही विक्री जुलै २०२१ मध्ये ११ हजार ३६८ झाली होती. महाराष्ट्राचा ट्रॅक्टर विक्रीत तिसरा क्रमांक लागतो. जुलैमध्ये २०२२ मध्ये महाराष्ट्रात ७ हजार १०८ ट्रॅक्टर विक्री झाली आहे. २०२१ जुलैमध्ये ही विक्री १० हजार ६६२ होती.
जुलै २०२२ मध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत घट होण्याची विविध कारणे आहेत. अनेक संकट आल्यामुळं ट्रॅक्टरच्या विक्रीत घट झाली आहे. मान्सून हंगामाचा असमान पडणारा पाऊस, तर जुलै महिन्यात काही ठिकाणी पूर यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जुलै महिन्यात देशाच्या विविध भागांमध्ये पावासानं थैमान घातलं होतं. याचा मोठा परिणाम यावर झाल्याचे दिसून आले.