जळगाव : केळी उत्पादनात जळगाव जिल्हा देशात अग्रेसर मानला जातो. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, फैजपूर, मुक्ताईनगर आदी भागात अत्याधुनिक पध्दतीने शेती केली जात असल्याने केळीचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेणे शक्य होते. मात्र येथील शेतकरी गत काही वर्षांपासून संकटात सापडला आहे. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नाही. यंदा तर केळीची लागवड करताच सी. एम. व्ही. (ककुम्बर मोझॅक व्हायरस) रोगचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेड येथील शेतकरी गोकुळ धनु पाटील यांनी तीन एकरातील ४ हजार रोपे ही काढून बांधावर फेकली आहेत.
गोकुळ पाटील यांनी ४ केळीची रोपे विकत आणली होती. लागवड होताच या रोपांवर एक विशिष्ट डाग आढळून आला. त्यामुळे वाढही खुंटली आणि भविष्यात याला फळधारणाही होणार नाही असे चित्र होते. त्यामुळे त्यांनी तीन एकरातील ४ हजार केळीची रोप उपटून थेट बांधावर फेकली. पाटील यांनी तर केळीच्या लागवड करताच ठिंबक सिंचन, सरी पद्धत आणि लागवडीसाठी असा लाखोंचा खर्च केला होता, पण लागवडीनंतर अवघ्या काही महिन्यात त्यांना ही रोपे काढावी लागली आहेत. यामुळे उत्पादन तर दुरच राहिले मात्र त्या आधी शेतकर्याला लाखों रुपयांचा फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात केळीच्या रोपांवर सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एखाद्यावेळी शेतकर्याने सीएमव्ही रोगाने बाधित झालेल्या झाडाचा कंद काढून कळत न कळतपणे लावला तर व्हायरस येऊ शकतो. टिश्यूकल्चरच्या रोपांमधून या व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही. केळीच्या रोपांची लागवड करतानाच ती निरोगी असणे गरजेचे आहे. अन्यथा व्हायरससारखे पिकांवर येणारे आजार हे आटोक्यात येणार नाहीत. त्यामुळे केळीची लागवड करतानाच रोपे ही रोगमुक्त आणि निरोगी असणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.