सोलापूर : थकीत वीजबिल वसूलीसाठी महावितरणने राज्यभरात धडक मोहिम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी अनाधिकृत जोडण्यात तोडण्यात आल्या आहेत. तर वीजबिल न भरणार्यांचा विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात येत आहे. मध्यंतरी थकित वीजबिलामुळे कृषीपंपांचाही विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. यामुळे उन्हाळी पिंकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांसह शेतकर्यांवर कारवाई करण्यात येत असतांना राज्यातील अनेक बड्या लोकप्रतिनीधींकडे लाखोंची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. नेत्यांनी थकविलेले हे लाखोंचे वीजबिल भरण्यासाठी सोलापुरातील शेतकरी अनिल पाटील यांनी भीकमागो आंदोलन सुरु केले आहे. शेतकर्याच्या या अनोख्या निषेध आंदोलनाची चर्चा राज्यभरात होत आहे.
महावितरणकडील आकडेवारीनुसार, राज्यातील ३२७ लोकप्रतिनीधींकडे हजारो आणि लाखोंच्या घरात थकबाकीचे आकडे आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यासारख्या नेत्यांकडे ४ लाखाहून अधिकची थकबाकी आहे. मात्र त्यांच्यावर कोणतील कारवाई करण्यात येत नाही. मात्र याचवेळी सर्वसमान्य शेतकर्यांवर कारवाई केली जाते. या निषधार्थ अनिल पाटील यांनी सोलापूरपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
सोलापुरातील रुपाभवानी मातेचं दर्शन घेऊन अनिल पाटील यांनी भीक मागायला सुरुवात केली. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस ते भीक मागणार असून मिळालेली रक्कम संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांकडे ते जमा करणार आहेत. फोन पे आणि गुगल पे च्या माध्यमातून ते ही भीक स्वीकारणार आहेत. गळ्यामध्ये एक खपाटाचा डब्बा अडकवून ते भीक मागात आहेत. त्यामुळे अनिल पाटील या शेतकर्याने सुरु केलेल्या या अतरंगी आंदोलनाची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे.